10 हजारांचे कर्ज देण्यास कुरबुर; बॅंकांविरुद्ध पुणे पालिकेची ‘आरबीआय’कडे तक्रार

पथारी व्यावसायिकांना कर्ज नाकारले

पुणे -“पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ योजनेंतर्गत पथारी व्यावसायिकांना 10 हजार रुपयांचे कर्ज देण्यास कुरबुर करणाऱ्या बॅंकांविरुद्ध महापालिकेने थेट शिखर बॅंक “आरबीआय’कडेच तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेने शिफारसपत्र देऊनही पथारी व्यावसायिकांना दहा हजार रुपयांचा पतपुरवठा करताना संबंधित बॅंकांकडून हमी म्हणून तारण आणि जामीन मागितले जात आहे. “पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ योजनेतंर्गत हा पतपुरवठा करताना कोणतेही तारण घेऊ नये, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले असतानाही, बॅंकाच्या या आडमुठेपणामुळे महापालिकेने थेट रिझर्व्ह बॅंकेकडेच तक्रार केली आहे.

करोना आपत्तीत टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पथारी व्यावसायिकांना खेळते भांडवल म्हणून दहा हजार रुपये पतपुरवठा करावा, यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर निधी योजना जाहीर केली. यानुसार 24 मार्च,2020 पूर्वी शहरामधील पथविक्रेते या योजनेच्या लाभास पात्र आहेत. त्यामुळे अनेक पथारी व्यावसायिकांनी कर्जप्राप्तीसाठी शिफारसपत्र मिळावे, यासाठी महापालिकेकडे अर्ज केले. महापालिकेनेही याबाबतची शहानिशा करून शेकडो पथारी व्यावसायिकांना शिफारस पत्र गेल्या काही दिवसात दिले आहेत.

बॅंकांकडे ठेवी असतानाही…
ज्या बॅंकांमध्ये पुणे महापालिकेच्या ठेवी आहेत, अशा बॅंकाही पथारी व्यावसायिकांना शिफारसपत्रावर दहा हजार रुपयांचे कर्ज देण्याला नकार देत आहेत, अशा बॅंकांमधील महापालिकेच्या ठेवी का काढू नयेत, असे पत्रही महापालिकेकडून संबंधित बॅंकांना लवकरच दिले जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.