प्रेयसीचा ‘विषारी’ कट, साप चावून प्रियकराची केली हत्या

उत्तराखंडमधील हल्दवानी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध व्यापारी अंकित चौहान खून प्रकरणाच्या तपासानंतर पोलिसांनी प्रेयसीच त्याची खुनी असल्याचे उघड केले असून तिनेच साप चावून प्रियकराची हत्या केली आहे.
15 जुलै रोजी पोलिसांना एका कारमध्ये संशयास्पद स्थितीत एक अज्ञात मृतदेह सापडला होता. तपासाअंती मृतदेहाची ओळख पटली, तो मृतदेह अंकित चौहान यांचा होता. अंकित चौहान हा हल्दवानी येथील व्यापारी होता.
अंकित चौहान खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी मंगळवारी हा खुलासा केला आहे. या हत्याकांडात एका महिलेसह पाच जणांचा सहभाग आहे, डॉली उर्फ माही असे या महिलेचे नाव असून, तिने या संपूर्ण हत्याकांडाचा कट रचला होता, अंकितच्या पायाला साप चावून हत्या करण्यात आली होती, यामध्ये सर्पमित्राचाही वापर करण्यात आला होता. सर्पमित्र रामनाथ यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
हल्दवानी रामपूर रोडवर कारमध्ये अंकित चौहानचा मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबीयांच्या फिर्यादीच्या आधारे 17 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या या प्रकरणातील माहीसह चार जण फरार असून, त्यांचा तपास पोलीस करत आहेत.
दुसरीकडे, या हत्येबाबत एसएसपी पंकज भट्ट यांनी सांगितले की, मृत अंकित चौहानचे माहीसोबत संबंध होते आणि माही अनेक दिवसांपासून अंकितला ब्लॅकमेल करून मोठी रक्कम उकळत होती. माहीला नंतर अंकितपासून सुटका हवी होती, पण अंकित सतत माहीला भेटत होता. अशा परिस्थितीत माहीने सर्पमित्र आणि इतर मित्रांच्या साहाय्याने अंकितला साप चावून ठार मारले.





