Girl Pushed in Canal: धक्कादायक! तरुणीला ओढत नेत कालव्यात फेकलं; १८ तासांनंतर समोर आला ‘हा’ भयंकर शेवट
Girl Pushed in Canal: मयत तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून मंचर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता (BNS) अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; आरोपीला अटक.

Girl Pushed in Canal : पुणे-नाशिक महामार्गावरील मंचर जवळील निघोटवाडी फाटा परिसरात घडलेल्या संतापजनक घटनेत एका तरुणीला ओढत नेत हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर आरोपीने स्वतःही कालव्यात उडी मारल्याचे सांगितले जात असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तरुणीचा मृतदेह तब्बल १८ तासांच्या शोधमोहिमेनंतर कालव्यातून बाहेर सोमवार, दि.१५ रोजी सकाळी काढण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयत मुलीचे वडील पोपट चिंधू भांगरे (वय ४१, रा. शितकलवस्ती, मंचर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रविवार दि.१४ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निघोटवाडी फाटा येथील सर्विस (सेवा) रस्त्यालगत ही घटना घडली.आरोपी रमेश बबन कडाळे (रा.खिल्लारवाडी, ता.जुन्नर) याने अज्ञात कारणावरून स्वप्ना पोपट भांगरे (वय २१) हीच्या सोबत झटापट केली. त्यानंतर तिला जबरदस्तीने ओढत नेत कालव्याच्या वाहत्या पाण्यात ढकलल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. तरुणी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने पोलिस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांनी रात्रभर शोधमोहीम राबविली. अखेर सोमवार दि.१५ रोजी सकाळी तिचा मृतदेह सापडला. या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.या घटनेमुळे आंबेगाव व जुन्नर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून मंचर पोलीस पुढील तपास करीत आहेत.





