Pimpri : गिरीश प्रभुणे यांची समाजाशी भक्ती आहे : जोशी

पिंपरी : ‘विचारांची भिन्नत असतानाही वेगवेगळ्या लोकांसोबत गिरीश प्रभुणे यांनी काम केले. त्यांची समाजाशी भक्ती आहे. त्यांनी समाजाला ईश्वर मानले. त्यांना समाजसेवेत ईश्वर दिसला. फळ मिळणारच आहे अशा विश्वासाने कर्म मार्गावर त्यांनी वाटचाल केली. त्यांचे कार्ये एक तप, साधना, व्रत आहे. अंतःकरणातील ईश्वराच्या बळावर त्यांनी आदर्श काम केल्याचे’ गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी काढले.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शनिवारी आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. जोशी यांच्या हस्ते प्रभुणे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी रवींद्र भोळे लिखित गिरीश प्रभुणे ‘जसे कळले तसे’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले.
चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमाला अरुंधती प्रभुणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, पद्मश्री रमेश पतंगे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, डॉ.सुनिल भंडगे, क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲड सतिश गोरडे, कोषाध्यक्ष रवी नामदे यावेळी उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ‘गेली अनेक वर्षे गिरीश प्रभुणे हे वंचित घटकांतील मुलांची सेवा करीत आहेत. पारधी समाजातील मुलांना शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणले जात आहे. त्यांच्या कामांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. प्रभुणे यांच्या मागणीनुसार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून क्रांतीवीर चापेकर यांच्या नावाने टपाल तिकीट काढले. चापेकर वाडा दुरुस्तीसाठी स्थायी समिती अध्यक्ष असताना १८ कोटी रुपयांचा निधी दिला. प्रभुणे यांच्या प्रयत्नामुळे चापेकरवाडा विकसित करण्यात आला आहे. प्रभुणे यांचे काम पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहे’.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलममध्ये वंचित घटकांतील मुलांना कौशल्यपूर्ण शिक्षण दिले जात आहे. पारधी समाजाचे मुले शिक्षणामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. गिरीश प्रभुणे यांच्या कामाचा प्रवाह नदीप्रमाणे आहे’.





