Girish Mahajan : बस्स… भाजप आता हाउसफुल झाला; महाजनांची नाव न घेता राऊतांवर टीका

नाशिक : नाशिकमध्ये काही लोक येऊन पोपटपंची करून निघून जातात. सकाळपासूनच त्यांच्या गर्जना सुरू होतात. परंतु, त्यांच्या पक्षात कुणी अध्यक्ष व्हायलाही तयार नाही. सुधाकर बडगुजरांपाठोपाठ त्यांनी महानगरप्रमुख केलेले मामा राजवाडेही भाजपत आले. आता त्यांनी गितेंना अध्यक्ष केले असले, तरी त्यांना आपल्याला भाजपमध्ये घ्यायचे नाही.
आता बस्स झालं, भाजप हाउसफुल्ल झाला, असे सांगत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता उद्धवसेनेवर टीका केली. उद्धवसेनेचे माजी नेते सुनील बागूल, माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी महाजनांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. गंगापूररोड वरील रावसाहेब थोरात सभागृहात हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार, खासदार, भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
महाजन म्हणाले, की देशात, राज्यात सर्वांचा ओघ भाजपकडे आहे. उद्धवसेनेने आता गितेंना महानगरप्रमुख केले आहे. तेही भाजपत आले असते, परंतु त्यांना घ्यायचे नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले. पक्षांतर्गत मतभेद बाजूला सारून महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी सज्ज व्हा. नाशिक महापालिकेत ११० जागा जिंकून राज्यात नवीन विक्रम प्रस्थापित करावा, असे आवाहन महाजन यांनी केले.





