पत्नीकडे 53 लाख 54 हजारांची मालमत्ता : प्रतिज्ञापत्रात नमूद केली माहिती
पुणे – भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्याकडे स्थावर आणि जंगम अशी मिळून 5 कोटी 26 लाख रुपयांची मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 53 लाख 54 हजार रुपयांची मालमत्ता आहे. बापट यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
बापट यांच्याकडे 75 हजार रुपये; तर पत्नीकडे 28 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. बापट यांच्याकडे 15 बॅंकांमध्ये मुदतठेवी आहेत. या मुदत ठेवींची एकूण रक्कम 52 लाख 27 हजार 934 रुपये इतकी आहे. तर बचत खात्यांमध्ये 32 लाख 21 हजार 187 रुपये आहेत. तर 18 हजार 320 रुपयांचे शेअर्स त्यांच्याकडे आहेत. पोस्ट खात्यामध्ये 13 लाख 68 हजार 618 रुपयांची रक्कम आहे. बापट यांच्या नावावर एकूण चार वाहने आहेत. यामध्ये 1983 सालची मर्सडीज कार असून त्याची सद्याची किंमत 2 लाख 30 हजार आहे. तर 2011 मधील पजेरो ही कार असून त्याची किंमत 18 लाख रुपये आहे. महिंद्रा ट्रॅक्टर 2017 मधील असून त्याची किंमत 8 लाख 12 हजार आहे. तसेच, 1977 मधील बजाज स्कूटर असून त्याची किंमत एक हजार रुपये इतकी आहे. बापट यांच्याकडे 40 ग्रॅम सोने असून त्याची किंमत 1 लाख 33 हजार रुपये आहे.
सावंगी मग्रापूर (ता. चांदूररेल्वे जि. अमरावती) येथे वारसाहक्काने मिळालेली जमीन आहे. तर याच गावामध्ये 1 हेक्टर 19 गुंठे इतकी जागा 2014 मध्ये खरेदी करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथेही जागा असून त्याची बाजारमुल्यानुसार किंमत 16 लाख 13 हजार रुपये इतकी आहे. तसेच, तळेगाव दाभाडे येथे 2003 मध्ये 15 गुंठे जागा खरेदी केली असून त्याची किंमत 35 लाख 40 हजार रुपये इतकी आहे. बापट यांच्या नावावर शनिवार पेठमध्ये तीन सदनिका आहेत. बिबवेवाडी येथे 1 हजार 412 चौरस फुटांची सदनिका असून त्याची किंमत 76 लाख 23 हजार रुपये इतकी आहे. अंधेरी येथे राजयोग सोसायटीमध्ये 842 चौरस फुटांची सदनिका असून त्याची बाजारमुल्यानुसार किंमत 1 कोटी 28 लाख 63 हजार रुपये इतकी आहे. या स्थावर मालमत्तेची एकूण किंमत 3 कोटी 96 लाख 48 हजार रुपये इतकी आहे.
बापट यांच्या पत्नीकडे 14 बॅंकांमध्ये 15 लाख 21 हजार 805 रुपयांच्या मुदतठेवी आहेत. तर सहा बचत खात्यांमध्ये 16 लाख 3 हजार 410 रुपयांची रक्कम आहे. तसेच, 35 हजार 700 रुपयांचे शेअर्स आहेत. एलआयसी व पोस्ट खात्यामध्ये 5 लाख 70 हजार 900 रुपयांच्या ठेवी आहेत. तर 2017 मध्ये खरेदी केलेली हुंदाई क्रेटा गाडी आहे. तसेच 24 हजार रुपयांचे सोने आहे. त्यांच्या नावे कोठेही स्थावर मालमत्ता नाही. तसेच त्यांच्या नावे 9 लाख 81 हजार रुपयांचे वाहन कर्ज असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
वेतन, भत्ते, पेन्शन, गुंतवणुकीवरील व्याज आणि शेती उत्पन्नाचे स्त्रोत
बापट यांनी 2013-14 या आर्थिक वर्षात 7 लाख 26 हजार 237 रुपये इतके वार्षिक उत्पन्न असल्याचे नमूद केले आहे. 2014-15 मध्ये 7 लाख 85 हजार रुपये, 2015-16 मध्ये 9 लाख 10 हजार रुपये, 2016-17 मध्ये 22 लाख 85 हजार रुपये तर 2017-18 मध्ये 31 लाख 49 हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न असल्याचे नमूद केले आहे. बापट यांनी वेतन व भत्ते, पेन्शन, गुंतवणुकीवरील व्याज आणि शेती हे उत्पन्नाचे स्त्रोत असल्याचे जाहीर केले आहे.