Ginger Burfi Recipe : हिवाळा सुरू झाला की आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. या ऋतूत तापमानातील बदलांमुळे सर्दी-खोकला, घशात खवखव आणि पचनाच्या तक्रारी वाढतात. आयुर्वेदात आल्याला रामबाण औषध मानलं जातं. चहात टाकून तर आपण आल घेतोच, पण आल्याची बर्फी हा त्याचा स्वादिष्ट आणि आरोग्यदायी प्रकार आहे. आयुष मंत्रालयानुसार आल्याची बर्फी ही केवळ चविष्ट मिठाई नाही, तर एक आयुर्वेदिक औषधही आहे. ती शरीराला उष्णता देते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते, भूक वाढवते आणि सर्दी-खोकल्यापासून संरक्षण करते. घरच्या घरी आल्याची बर्फी कशी बनवावी? लागणारे साहित्य: ताजं आल, देसी गूळ, देसी तूप, सोंठ, जिरे, काळी मिरी, वेलची, दालचिनी, तेजपत्ता, पिपळी, धणे पावडर. इच्छेनुसार तीळही घालू शकता. बनवण्याची पद्धत: प्रथम गूळ मंद आचेवर वितळवून घट्ट पाक तयार करा. त्यात किसलेलं अदरक घालून ५ ते ७ मिनिटे परतून घ्या. नंतर तूप घालून ५ ते १० मिनिटे शिजवा. त्यानंतर सर्व मसाल्यांची बारीक पावडर टाकून मिश्रण सतत ढवळत ८ ते १० मिनिटे शिजवा. मिश्रण कढई सोडू लागल्यावर तुप लावलेल्या ताटात पसरवा. थंड झाल्यावर चौकोनी वड्या कापा. पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा. ही बर्फी साधारण एक महिना टिकते. आल्याच्या बर्फीचे फायदे आल्याची बर्फी खाल्ल्याने पचन सुधारतं, भूक वाढते, घशातील खवखव कमी होते आणि सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. हिवाळ्यात रोज १-२ छोटे तुकडे खाल्ल्यास थंडीपासून बचाव होतो आणि सांधेदुखीही कमी होते. काळजी घ्या आल्याची तासीर उष्ण असल्याने त्याचं अति सेवन टाळावं. रिकाम्या पोटी खाल्ल्यास आम्लपित्त किंवा पोटाच्या तक्रारी होऊ शकतात. कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सेवन करावं. हिवाळ्यात चव आणि आरोग्य दोन्ही हवं असेल, तर आल्याची बर्फी नक्की करून पाहा.