मुंबई – प्रख्यात गझलकार-गायक भूपिंदर सिंग यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते अनेक आजारांनी ग्रस्त होते, तसेच त्यांना युरिनरी इन्फेक्शनही झाले होते. अखेर आज मुंबईमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. गायक भूपिंदर सिंग यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1940 रोजी अमृतसर येथे झाला. वडील नत्था सिंग यांच्याकडून त्यांना संगीताचे प्राथमिक शिक्षण मिळाले. ते लहानपणापासून गिटार वाजवत होते. ते बॉलिवूडमधील नावाजलेले गायक असून त्यांच्या नावावर अनेक हिट गाणी आहेत. त्यांनी गायलेल्या गझलमुळे त्यांना एक विशेष ओळख मिळाली आहे. त्यांच्या पत्नी मिताली सिंग यादेखील प्रख्यात गायिका आहेत. पत्नी मिताली यांच्यासोबत त्यांनी गझल गायनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.