Inflation : घरगुती जेवण पुन्हा महागले! कांदा-तेल-तांदळाच्या दरवाढीने थाळीच्या किमतीवर परिणाम
Inflation : ऑगस्टमध्ये घरगुती जेवणाच्या किमतीत माफक वाढ झाली. कांदा, खाद्यतेल, तांदूळ आणि एलपीजी महागल्याने थाळीचा खर्च वाढला.

Inflation : ऑगस्ट महिन्यात घरगुती जेवणाच्या किमतीत माफक वाढ झाली आहे. देशांतर्गत रेटिंग एजन्सी ‘क्रिसिल’च्या संशोधन शाखेच्या अहवालानुसार, शाकाहारी थाळीची सरासरी किंमत वार्षिक आणि मासिक आधारावर १ टक्क्याने वाढून २९.५ रुपये झाली आहे.
मांसाहारी थाळीच्या किमतीत वार्षिक तुलनेत ५ टक्क्यांनी वाढ झाली असून ती ५७.५ रुपयांवर पोहोचली आहे. बॉयलर कोंबड्यांच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ झाल्याने मांसाहारी थाळी महागली. मात्र, जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये या थाळीची किंमत १ टक्क्याने कमी झाली.
‘क्रिसिल इंटेलिजन्स’च्या ‘रोटी राईस रेट’ अहवालानुसार, बटाटा आणि टोमॅटो स्वस्त झाले असले तरी कांदा, खाद्यतेल, तांदूळ आणि एलपीजीच्या वाढलेल्या किमतींमुळे थाळीचा खर्च मागील वर्षाच्या तुलनेत जास्त राहिला.
महाराष्ट्रात मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांद्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. त्यामुळे ऑगस्टमध्ये कांद्याचा दर मागील वर्षीच्या २८ रुपयांच्या तुलनेत ४३ टक्क्यांनी वाढून ४० रुपये किलो झाला. खाद्यतेलाच्या दरात ११ टक्के, तर एलपीजीच्या दरात १० टक्के वाढ झाली.
दुसरीकडे, बटाट्याचे दर १२ टक्के आणि टोमॅटोचे दर २८ टक्क्यांनी कमी झाल्याने थाळीच्या एकूण खर्चातील वाढ मर्यादित राहिली. पुढील दोन-तीन महिन्यांत कांद्याचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.
मासिक आधारावर कांद्याच्या दरात १७ टक्के वाढ झाली. मात्र, टोमॅटो ७ टक्क्यांनी स्वस्त झाल्याने त्याचा एकूण परिणाम मर्यादित राहिला. श्रावण महिन्यामुळे बॉयलर कोंबडीच्या मागणीत घट झाली आणि दर ४ टक्क्यांनी कमी झाले. त्यामुळे मांसाहारी थाळीच्या किमतीत मासिक आधारावर १ टक्क्याची घट झाली.





