पुणे – खडकवासला येथिल डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीच्या 12 व्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संशोधन संस्थांना प्रगत तंत्रज्ञानामध्ये त्यांच्या प्रयत्नांना गती देण्याचे आवाहन केले. सायबर आणि अंतराळ क्षेत्रातील उदयोन्मुख धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी भारताने पूर्णपणे सज्ज असण्याची गरज सिंह यांनी व्यक्त केली. सिंह यांनी जागतिक राजकारण आणि अर्थशास्त्राच्या झपाट्याने विकसित होणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकला. तसेच विज्ञान, तंत्रज्ञान आणि युद्धाच्या क्षेत्रात पुढे राहणे महत्वाचे असल्याचे नमूद केले. प्रगत तंत्रज्ञानाच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. सिंह म्हणाले, जर आपल्या प्रतिस्पर्ध्याकडे अधिक प्रगत तंत्रज्ञान असेल तर ते भविष्यात आपल्यासाठी चिंतेचे कारण ठरू शकते. संरक्षण क्षेत्रात “आत्मनिर्भर’ होण्यासाठी सरकारच्या दृष्टीकोनाला संबोधित करताना सिंग यांनी देशाच्या सुरक्षा यंत्रणेला बळकट करण्यात आपली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. त्यांनी स्पष्ट केले की स्वावलंबनाचा अर्थ जगापासून अलिप्त होणे असा नाही. आपल्या मित्र देशांच्या सुरक्षेच्या गरजा पूर्ण करताना सशस्त्र दलांच्या गरजा पूर्ण करणे हे आत्मनिर्भरतेचे उद्दिष्ट आहे. सिंह यांनी संरक्षण उपकरणांच्या आयातीवरील अवलंबित्वाबद्दल चिंता व्यक्त केली. यामुळे भारताच्या धोरणात्मक स्वायत्ततेला बाधा येऊ शकते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता मिळविण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करत आहे. सिंह यांनी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी आयात कमी करणे आणि निव्वळ निर्यातदार बनण्याच्या महत्त्वावर भर दिला. आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने उचललेल्या अनेक पावलांवर प्रकाश टाकला, ज्यात सशस्त्र दल आणि संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम या दोन्हींसाठी सकारात्मक स्वदेशीकरण सूची जारी करणे समाविष्ट आहे. या सूचींमध्ये विविध प्रणाली, उपकरणे आणि घटक समाविष्ट आहेत जे संरक्षणासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहेत.दीक्षांत समारंभादरम्यान, संरक्षण मंत्री सिंह यांनी 283 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली. यामध्ये ए.टेक/ एम.एससी च्या 261 आणि पीएच.डी. च्या 22 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय 20 सुवर्णपदके देण्यात आली. “संरक्षण संशोधनाचा सर्वसामान्यांना लाभ व्हावा’ आरोग्य विषयातील ‘प्लॅस्टिक सर्जरी’ क्षेत्रातील झालेले संशोधन हे संरक्षण क्षेत्रासाठी होते, परंतु कालांतराने त्याचा फायदा सर्वसामान्यांन झाला. सध्या “जीपीएस सिस्टिम’ म्हणून जगभर वापरली जाणारी “नेव्हीगेशन सिस्टिम’ ही संरक्षण क्षेत्रासाठी तयार करण्यात आली होती. हे संशोधन कालांतराने सर्वसामान्यांनाही उपयोगी पडतात. त्यामुळे सर्वसामान्यांनाही उपयोगी पडतील असे संशोधन करून ते विकसित करण्याची जबाबदारी ‘डाएट’ (डीआयएटी) सारख्या संस्थांनी घ्यावी, अशी अपेक्षा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. संरक्षण क्षेत्राला लागणारी सर्व उपकरणे, सामुग्री आयात करावी लागणे म्हणजे त्या देशाला इतर देशांचे अवलंबित्व स्वीकारावे लागते. भारतासारख्या देशाला आता हे करण्याची गरज नाही. याच देशात सामुग्री आणि उपकरणे तयार करायला यशस्वीरीत्या सुरूवात झाली आहे. काही दिवसांनी आपला देश संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा निर्यातदार होईल. जेव्हा विमानापासून त्याच्या एका छोट्या भागापर्यंत सगळे काही भारतात तयार होईल; तेव्हा देशाची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ शकेल, हे सांगताना त्यांनी संरक्षण क्षेत्रातील निर्यातीवर अधिक भर देत असल्याचे स्पष्ट केले.