सातारा – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या, दि. 18 रोजी सकाळी 10 वाजता दहिवडी येथे सभा होणार आहे. माण-खटाव विधानसभा मतदारसंघात भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे. या ऐतिहासिक सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांनी केले.
दहिवडी येथे कार्यकर्ते व मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, शिवसेना ही सामाजिक चळवळ आहे. शिवसेनेचा शब्द अंतिम असतो. आपणही त्यांना या मतदारसंघातून आमदार देण्याचा शब्द दिला आहे.
तो खरा करून दाखवण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी. या मतदारसंघात भगवा फडकवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. विविध सिंचन योजना मार्गी लावून या तालुक्यांना कायमस्वरूपी पाणी कसे देता येईल यासाठी शिवसेनेची धडपड होती. मात्र, आघाडी सरकारच्या काळात या योजना रखडल्या. या योजनांना शिवसेना पुन्हा गती देत आहे. परिवर्तनाचे साक्षीदार होण्यासाठी शिवसेनेची ताकद वाढवावी.