बर्लिन – जगाच्या पाठीवर बहुतेक देशांमध्ये अमलीद्रव्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शेतीवर आणि उद्योगावर बंदी आहे. अशाप्रकारचा व्यवसाय करणे बेकायदेशीर असून त्याबद्दल शिक्षाही भोगावी लागते. पण आता जर्मन सरकारने आपल्या देशामध्ये गांजाची शेती करणे वैध ठरवले असून सर्वसामान्य नागरिक आपल्या घराच्या किंवा बंगल्याच्या अंगणामध्ये सुद्धा गांजाचे पीक घेऊ शकतील. जर्मनी च्या संसदेमध्ये याबाबतचे विधेयक लवकरच मांडण्यात येणार असून या विधेयकाला दोन दिवसांपूर्वी जर्मन कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. गांज्याची वाढती तस्करी रोखण्यासाठी आणि अमलीद्रव्य पदार्थांच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे जर्मन सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. जर्मनीव्यतिरिक्त आणखीन काही देशांनी सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये गांजाची शेती खुली केली आहे. पण भारतामध्ये मात्र गेल्या 38 वर्षापासून गांजाची शेती करणे बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. भारतात भांगेसारख्या अमली पदार्थांवर कोणतेही बंधन नाहीत पण गांजाच्या शेतीवर मात्र बंधने घालण्यात आली आहेत. जर्मन सरकारने हे विधेयक मांडत असताना सर्वसामान्य नागरिकांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये असे म्हटले आहे. गांजाचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारकच आहे पण गैरव्यवहार आणि तस्करी रोखण्यासाठी गांजाच्या शेतीला परवानगी देण्यात येत आहे असे जर्मन सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. जर्मन संसदेच्या पुढील अधिवेशनामध्ये या विधेयकावर चर्चा होताना मोठ्या प्रमाणावर गदारोळ माजण्याची भीतीही व्यक्त होत आहे. या विधेयकाला विरोधही होण्याची शक्यता आहे. अमली पदार्थांचे तस्करच अप्रत्यक्षरीत्या या विधेयकाला विरोध करण्याचा प्रयत्न करतील गांजा शेतीला जर वैधपणा दिला तर सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा त्यातील व्यापारी गुंतागुंत कळु शकते आणि सध्या बाजारामध्ये ज्या अव्वाच्या सव्वा किमतीने गांजा विकला जातो त्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना होईल आणि आपल्या धंद्यावर परिणाम होईल अशी भीती आता तस्करांना वाटत आहे. या विधेयकामध्ये किती वयोगटातील लोक दरमहा किती गांजाचे सेवन करू शकतील या प्रकारचे नियमही करण्यात आले आहेत असे समजते.