Pimpri : पर्यावरणाला जनरेटरच्या धुराचा धोका

माथेरान : वाहनमुक्त, प्रदूषणमुक्त आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरानसारख्या पर्यावरण संवेदनशील पर्यटनस्थळी गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण वीज पुरवठा खंडित आहे. यामुळे स्थानिक नागरिक, हॉटेल व्यवसायिक, पर्यटक आणि रुग्णालये डिझेल जनरेटरच्या मदतीने चालवले जात असून, जनरेटरच्या आवाज आणि धुरामुळे या सुंदर पर्वतीय नगरीत प्रदूषण वाढत आहे.
शुद्ध आणि शांत हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या माथेरानमध्ये सध्या डिझेलचा धूर आणि जनरेटरचा आवाज गोंगाट निर्माण करत असून, पर्यावरणाचा घात होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करत शासनाच्या दुटप्पी धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुंबईसारख्या महानगरांमध्ये वीज गेल्यास काही मिनिटांतच पुरवठा पूर्ववत होतो, मात्र माथेरानमध्ये दोन दिवस वीज नाही. यावर कोणीच जबाबदारी घेण्यास तयार नाही. राज्य शासन, वीज महामंडळ आणि पर्यावरण विभाग यांच्या निष्काळजीपणामुळे माथेरानचे पर्यावरण आणि पर्यटन दोन्ही धोक्यात आले आहे.
डिझेल जनरेटरच्या सतत वापरामुळे हवेत प्रदूषक घटकांचे प्रमाण वाढत असून, जनरेटरचा आवाज नैसर्गिक शांततेला बाधा पोहोचवत आहे. याचा परिणाम येथे आढळणाऱ्या पक्ष्यांपासून प्राण्यांपर्यंत सर्व जैवविविधतेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या परिस्थितीवर अद्याप कोणतेही ठोस पावले न उचलल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सरकार, पर्यावरण विभाग व वीज महामंडळ यांनी तातडीने उपाययोजना न केल्यास, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी स्पष्टपणे दिला आहे. निसर्गप्रेमी, पर्यटक, स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येत, माथेरानसाठी सौरऊर्जा, वारा ऊर्जा यांसारख्या पर्यावरणपूरक व स्थायिक वीज उपाययोजनांची मागणी केली आहे. माथेरानचे पर्यावरण वाचवण्यासाठी प्रशासनाने तातडीने जागे होणे गरजेचे आहे, अन्यथा या स्वर्गासारख्या ठिकाणाचा नाश अटळ असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पर्यावरण नियम फक्त सामान्यांसाठीच का?
स्थानिक प्रशासन आणि वनविभागाकडून नागरिकांवर प्लॅस्टिक बंदी, ध्वनी प्रदूषण, सौरऊर्जा वापर आदी नियम कडकपणे लादतात. मात्र वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर डिझेल जनरेटरसारखे पर्यावरणविघातक पर्याय शासनच उघडपणे वापरत आसल्याचे चित्र दिसत आहे.
वीज महामंडळाने या समस्येकडे पर्यावरण संवर्धन या दृष्टिकोणातून बघितले पाहिजे. डिझेल जनरेटरमुळे उत्सर्जित होणार धूर आणि आवाज हे दोन्ही प्रदूषणाचे स्त्रोत आहेत. वीज महामंडळाने तातडीने युद्ध पातळीवर काम करून वीज पुरवठा पूर्ववत करणे हे काळाची गरज आहे
– अनुकेतन सावंत, पर्यावरण प्रेमी, माथेरान





