पुणे- भारताचे पहिले संरक्षण दलप्रमुख जनरल बिपीन रावत हे दि.15 नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी खडकवासला परिसरातील मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मिलिट) संस्थेला भेट दिली होती. ही त्यांची पुण्यातील अखेरची भेट ठरली.
जनरल रावत यांचा पुण्याशी जुना संबंध होता. त्यांनी दि. 1 जानेवारी ते 30 ऑगस्ट 2016 या कालावधीत दक्षिण मुख्यालय प्रमुखपदाचा कार्यभार सांभाळला आहे. तर, लष्कर प्रमुख या पदावर असताना त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसहित (एनडीए) विविध लष्करी आस्थापनांना भेटीदेखील दिल्या आहेत. पुण्यात आयोजित विविध संयुक्त लष्करी सरावासाठी त्यांची प्रमुख उपस्थिती राहिली. त्यांनी नेहमीच तिन्ही सैन्य दलांमधील परस्पर सामंजस्य वाढवण्यावर भर दिला. तिन्ही सैन्यदलांच्या एकत्रीकरणासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. मुख्यालयप्रमुख या पदावर असतानाही त्यांनी लष्करात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर दिला होता. भारतीय सैन्य दलाचे सरसेनापती झाल्यानंतरही जनरल रावत यांनी पुण्यातील विविध लष्करी आस्थापनांना भेटी देऊन त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.
रावत यांनी 15 नोव्हेंबर रोजी मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे “भारतीय सशस्त्र दलांचे एकात्मिकरण’ विषयावर संरक्षण सेवा तांत्रिक कर्मचारी अभ्यासक्रमाचे 142 विद्यार्थी-अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते. यावेळी त्यांनी भारतीय सशस्त्र दलांच्या संयुक्त युद्ध लढ्यासाठी संयुक्तपणा, एकात्मता आणि भविष्यातील वाटचाल या पैलूंवर प्रकाश टाकला होता. त्यांची ही भेट पुण्यातील शेवटची भेट ठरली.
(वृत्तसंकलन ः गायत्री वाजपेयी)
कुलगुरू डॉ. करमळकर
यांनी जागवल्या आठवणी…
“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्यानात 2017 साली जनरल बिपिन रावत यांनी मार्गदर्शन केले होते. त्यावेळी ते लष्करप्रमुख होते. त्यामुळे अर्थात लष्करी शिष्टाचाराचे काटेकोर पालन करण्यात आले होते. त्यावेळी विद्यापीठाचा कुलगुरू या नात्याने माझ्या दालनात त्यांच्याशी काही वेळ संवाद साधायची संधी मिळाली होती. त्या भेटीत जनरल रावत यांच्या साधेपणाचे दर्शन घडले. कोणताही रूबाब न बाळगता अतिशय आपुलकीने त्यांनी विद्यापीठाबद्दल जाणून घेत, छान गप्पा मारल्या. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधताना कोणतीही दरी जाणवली,’ अशा शब्दांत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी जनरल रावत यांच्याविषयी आठवणी जागवल्या.