जयपूर – राजस्थानच्या राजकारणात सध्या गोपनीय अशा “लाल डायरी’ची चर्चा सुरु आहे. आपल्या गुरुवारच्या राजस्थान भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, राजस्थान सरकारचे पदच्युत मंत्री राजेंद्र गुढा यांनी उल्लेख केलेल्या गोपनीय “लाल डायरी’मध्ये गेहलोत सरकारच्या भ्रष्टाचाराच्या नोंदी आहेत.
गेल्या शुक्रवारी राजस्थान सरकारचे मंत्री राजेंद्र गुढा यांनी विधानसभेत आपल्याच सरकारला घेराव घालण्यास सुरुवात केली. राजस्थानमध्ये किमान उत्पन्न हमी विधेयक 2023 वर चर्चा सुरु होती. दरम्यान, कॉंग्रेस आमदारांनी भाजपवर निशाणा साधत मणिपूर हिंसाचाराचे फलक लावायला सुरुवात केली. त्यावेळी मंत्री राजेंद्र गुढा हेही सभागृहात उपस्थित होते. यादरम्यान त्यांनी आपल्याच सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. गुढा म्हणाले, ‘सत्य हे आहे की महिलांचे संरक्षण करण्यात आपण (राजस्थान सरकार) अपयशी ठरलो आहोत. राजस्थानमध्ये ज्या प्रकारे महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, त्याकडे मणिपूरऐवजी आपणच आत्मपरिक्षण केले पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘राजस्थानमध्ये सरकार चालवण्याच्या नावाखाली कॉंग्रेसने केवळ लुटीचे दुकान चालवले असून खोट्याचा बाजार चालवला आहे. खोट्याच्या दुकानाचे नवीनतम उत्पादन म्हणजे राजस्थानची ‘लाल डायरी’. या डायरीमध्ये कॉंग्रेस सरकारच्या काळ्या कारभाराची नोंद असल्याचे बोलले जात आहे. ‘लाल डायरी’ची पाने उघडली तर अनेक रहस्ये खुली होतील, असे लोक सांगत आहेत.
गुढा यांच्या स्वत:च्याच पक्षावरील हल्ल्याने राजस्थान सरकार अस्वस्थ झाले. तडकाफडकी अशोक गेहलोत यांनी गुढा यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी केली. मंत्रिपदावरून हटवल्यानंतर गुढा रडत मीडियासमोर आले. ते म्हणाले की, मला सत्य बोलण्याची शिक्षा झाली आहे. महिलांवरील अत्याचारात राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे. मी काय चुकीचे बोललो? लोक माझ्यासोबत असतील आणि मी त्यांच्यासाठी काम करत राहीन. मग गेहलोत मला मंत्रिमंडळातून काढून टाकतील किंवा तुरुंगात पाठवतील. मी जिवंत असेपर्यंत बोलत राहीन. या मुद्द्यावर मला अशोक गेहलोत यांना काही बोलायचे होते. राज्यातील पोलीस भ्रष्ट आहेत. ते लोकांकडून लाच घेण्यात व्यस्त आहेत.
यानंतर सोमवारी राजेंद्र गुढा पुन्हा विधानसभेत पोहोचले आणि स्पीकरसमोर त्यांनी लाल रंगाची डायरी दाखवली. यानंतर सभापती सीपी जोशी यांनी मार्शलना बोलावून बाहेर काढले.
राजेंद्र गुढा यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत सविस्तर माहिती दिली. या डायरीत कॉंग्रेस नेत्यांच्या काळ्या कारनाम्यांची संपूर्ण माहिती असल्याचा दावा त्यांनी केला. कोणता नेता स्वतःवर चित्रपट बनवतोय; कॉंग्रेसने राज्यसभेतील आमदारांना काय आणि कसे दिले; अशोक गेहलोत यांनी क्रिकेट संघटनांच्या निवडणुकीत कोणाला, कसे आणि किती पैसे दिले; पोलिस खात्याची वसुली कोठून होते.