टी-20 क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ मानला जातो. यात फलंदाज प्रत्येक चेंडूवर मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात असतात, त्यामुळे गोलंदाजांसाठी २-३ बळी घेणेदेखील मोठी उपलब्धी ठरते. हॅट्रिक तर सोन्याहून पिवळे! पण इंडोनेशियाच्या गोलंदाजाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात ५ बळी घेऊन नवा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. हा पराक्रम पुरुष किंवा महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याआधी कधीच घडला नव्हता. इंडोनेशिया आणि कंबोडिया यांच्यातील टी-२० मालिका इंडोनेशिया आणि कंबोडिया यांच्यात ८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना २३ डिसेंबर २०२५ रोजी बाली येथे खेळला गेला. कंबोडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंडोनेशियाने प्रथम फलंदाजी करताना विकेटकीपर-फलंदाज धर्मा केसुमाच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर मजबूत धावसंख्या उभारली. केसुमाने ६८ चेंडूत नाबाद ११० धावा फटकावल्या, ज्यात ८ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. या खेळीच्या बळावर इंडोनेशियाने २० षटकांत ५ बाद १६७ धावा केल्या. कंबोडियाकडून एटिने ब्यूक्स आणि शाह अब्रार हुसेन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. गेडे प्रियांदनाची विक्रमी कामगिरी कंबोडियाला विजयासाठी १६८ धावांचे आव्हान होते. धावांचा पाठलाग करताना कंबोडियाची सुरुवात खराब झाली, पण १५ षटकांअखेर त्यांनी ५ बाद १०६ धावा केल्या होत्या. त्यांना विजयासाठी शेवटच्या ५ षटकांत ६२ धावांची गरज होती आणि ५ बळी शिल्लक होते. सामना रोमांचक वळणावर आला होता. याच वेळी इंडोनेशियाकडून १६ वे षटक टाकण्यासाठी २८ वर्षीय उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज गेडे प्रियांदना गोलंदाजीला आला. त्याने आपल्या पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन फलंदाजांना बाद करत हॅट्रिक पूर्ण केली. त्याने शाह अब्रार हुसेन, निर्मलजित सिंग आणि चांथोएन रथानाक यांना माघारी धाडले. चौथ्या चेंडूवर डॉट बॉल टाकल्यानंतर, पाचव्या चेंडूवर मोंगदारा सोक आणि सहाव्या चेंडूआधी एक वाईड टाकला. शेवटच्या वैध चेंडूवर पेल वेन्नाकला बाद करत त्याने एकाच षटकात ५ बळी पूर्ण केले. या षटकात फक्त १ धाव (वाईड) खर्च झाली आणि कंबोडिया १०७ धावांवर गारद झाला. इंडोनेशियाने सामना ६० धावांनी जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. याआधीचे विक्रम टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याआधी एकाच षटकात जास्तीत जास्त ४ बळी घेण्याचा विक्रम १४ वेळा झाला होता. टी-२० क्रिकेटमध्ये (आंतरराष्ट्रीय नव्हे, तर घरगुती) याआधी दोनच वेळा एकाच षटकात ५ बळी घेण्याचा पराक्रम झाला होता. बांगलादेशच्या अल-अमिन हुसेन (२०१३-१४) आणि भारताच्या अभिमन्यू मिथुन (२०१९-२० सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी) ने हा विक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र गेडे प्रियांदना हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे, ज्याने एकट्याने एका षटकात ५ बळी घेतले. हा विक्रम इंडोनेशियन क्रिकेटसाठी ऐतिहासिक क्षण ठरला आहे. गेडे प्रियांदना हा इंडोनेशियाचा अष्टपैलू खेळाडू आहे, ज्याने ६३ टी-२०आंतरराष्ट्रीय सामन्यांत १०४० धावा आणि २४ बळी घेतले आहेत. या कामगिरीने त्याने जागतिक क्रिकेटमध्ये इंडोनेशियाचे नाव उज्ज्वल केले आहे.