Stock Market: सेन्सेक्स – निफ्टीने गाठला ऐतिहासिक उच्चांक; GDPचे आकडे अपेक्षेपेक्षा चांगले आल्याचा परिणाम

Stock Market Closing : आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत देशाच्या GDPमध्ये 8.4 टक्के वाढ झाली आहे. ही वाढ अपेक्षेपेक्षा जास्त आहे, त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला असून आज शुक्रवारी (दि. 1 मार्च) सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. उत्कृष्ट जागतिक संकेतांमुळेही आज मार्केटमध्ये वाढ झाली आहे.
आजच्या सत्रात गुंतवणूकदारांनी बँकिंग, ऊर्जा समभागांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यामुळे बाजारात ही वाढ दिसून आली. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने ऐतिहासिक उच्चांक गाठला. सेन्सेक्सने 73,819 अंकांची विक्रमी पातळी गाठली आणि निफ्टीने 22,353 अंकांची पातळी गाठली. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 1245 अंकांच्या उसळीसह 73,745 वर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 356 अंकांच्या उसळीसह 22,338 वर बंद झाला.
शेअर बाजाराच्या आजच्या वाढीमध्ये सर्वात मोठा वाटा बँकिंग शेअर्सचा आहे. निफ्टी बँक 2.53 टक्के आणि 1166 अंकांच्या वाढीसह बंद झाला आहे. निफ्टी बँकेचे सर्व 12 समभाग हिरव्या रंगात बंद झाले. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकातही मजबूत वाढ दिसून आली आहे.
याशिवाय ऑटो, एफएमसीजी, मेटल, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल अँड गॅस सेक्टर्सचे शेअर्स तेजीने बंद झाले. तर हेल्थकेअर, फार्मा आणि आयटी समभागात घसरण झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप क्षेत्रातील समभागांमध्येही वाढ दिसून आली. दोन्ही निर्देशांक वाढीसह बंद झाले.
मार्केट कॅपमध्ये वाढ –
शेअर बाजारातील प्रचंड वाढीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी झेप घेतली आहे. आजच्या व्यवहारात बीएसईचे मार्केट कॅप 4.28 लाख कोटी रुपयांच्या उसळीसह 392.23 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. तर याआधी शेवटच्या सत्रात मार्केट कॅप 387.95 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात टाटा स्टील 6.46 टक्के, लार्सन 4.48 टक्के, आयसीआयसीआय बँक 3.30 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.




