Gaza : गाझामध्ये मदतची वाट बघणारे 73 जण गोळीबारात ठार

देर अल-बलाह (गाझा पट्टा) : गाझामध्ये मदत केंद्रावर मदतीची वाट बघणारे तब्बल 73 जण रविवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनांमध्ये ठार झाले. पॅलेस्टिनी प्रशासनाच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. गोळीबारात सर्वाधिक 67 जण गाझाच्या उत्तरेकडील भागांमध्ये मदत केंद्रांजवळ ठार झाले. इस्रायलमधून झिकिम क्रॉसिंगवरून येणाऱ्या मदतीची हे लोक वाट बघत होते.
गोळीबारामध्ये किमान 150 जण जखमी झाले असून त्यापैकी काही जण गंभीर जखमी असल्याचे आरोग्य मंत्रालय आणि रुग्णालयाच्या सूत्रांनी म्हटले आहे. हा गोळीबार इस्रायली सैन्याने केला होता, का सशस्त्र टोळ्यांनी केला होता हे स्पष्ट होऊ शकले नाही. इस्रायली सैन्याने गर्दीवर गोळीबार केल्याचे काही साक्षीदारांनी सांगितले.
गाझातील अन्य भागातल्या मदत केंद्रांजवळच्या गोळीराच्या घटनेत उर्वरित पॅलेस्टिनी ठार झाले. दिवसभरात तब्बल ७३ लक मदत केंद्रांजवळच्या गोळीबारामध्ये ठार झाल्याची ही पहिलीच वेळ आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या सहकार्याने सुरू केलेल्या मदत केंद्राजवळ ही घटना घडलेली नाही. पण या मदत केंद्राची मदत मिळवण्यासाठी येणारे शेकडो लोक आतापर्यंत मारले गेले आहेत.
घोळीबाराच्या या घटनेवर इस्रायली सैन्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गाझामध्ये अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा जाणवत असून गेल्या महिन्याभरात ७० जण उपासमारीमुळे मरण पावल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय पातळीवरून या स्थितीबाबत प्रचंड चिंता व्यक्त केली जाते आहे. उपासमारीमुळे होत असलेल्या मृत्यूंमध्ये लहान मुलांचे प्रमाण लक्षणीय आहे.





