Pimpri : गव्हाणकर विद्यामंदिर बंद होण्याच्या मार्गावर

माथेरान : शहरातील प्रा.शां.य. गव्हाणकर विद्यामंदिर ही ५० वर्षांहून अधिक परंपरा असलेली शाळा सध्या अस्तित्वाच्या संकटात सापडली आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे शाळेवर अक्षरशः बंद होण्याची वेळ आली असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत पालक आणि नागरिकांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली आहे.
सध्या या शाळेत विज्ञान विषयाचा शिक्षक पद रिक्त आहे. नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांनी अद्याप कार्यभार स्वीकारलेला नाही. परिणामी फक्त दोन शिक्षकांवर संपूर्ण शाळेची जबाबदारी येऊन पडली आहे. डोंगराळ व दुर्गम भागातील शाळांमध्ये बदली होण्यास शिक्षक टाळाटाळ करतात, याचा थेट परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
शाळेचे माजी विद्यार्थी आणि माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला तातडीने शिक्षक रुजू करण्याची मागणी केली आहे. या शाळेत शिकलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. अशी परंपरा असलेली शाळा बंद होणे हे माथेरानसाठी मोठे नुकसान ठरेल, असे त्यांनी म्हंटले आहे.
पाचवी-सहावी वर्ग सुरू करण्याचा निर्णय दूरदृष्टीशून्य
माथेरानच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता नगरपालिकेच्या शाळेत पाचवी-सहावी वर्ग सुरू करण्याचा निर्णय हा दूरदृष्टीशून्य ठरला. परिणामी गव्हाणकर एज्युकेशन ट्रस्टसारखी ५०-६० वर्षांचा विश्वास संपादन केलेली शाळा आज उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आली आहे.
आम्ही तीन महिन्यांपूर्वीच शिक्षण विभागाकडे विज्ञान शिक्षक नेमण्याची मागणी केली होती. मात्र अजूनही आठवी, नववी आणि दहावीसाठी शिक्षक मिळालेला नाही. शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र संपत आले असून परीक्षा जवळ आल्या आहेत. शिक्षक न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
– शशिभूषण गव्हाणकर, प्राचार्य





