मुंबई: काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. मुंबईचा युवा फलंदाज सरफराज खानच्या भारतीय संघातील निवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी गंभीर यांच्यावर निशाणा साधला आहे. सरफराजला त्याच्या आडनावामुळे संघात स्थान मिळत नसल्याचा गंभीर आरोप शमा मोहम्मद यांनी केला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले, “सरफराज खानला त्याच्या आडनावामुळे निवडलं नाही का? मी फक्त विचारतेय, आम्हाला माहितीय गौतम गंभीर या बाबतीत काय विचार करतो.” सरफराज खानच्या निवडीवरुन वाद सरफराज खानने अलीकडेच न्यूझीलंडविरुद्धच्या देशांतर्गत कसोटी मालिकेत भारतीय संघाकडून खेळला होता. मात्र, त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, इंग्लंड दौऱ्यावरील मालिका आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या देशांतर्गत मालिकेसाठी संघात स्थान मिळाले नाही. तसेच, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी इंडिया ‘ए’ संघातही त्याची निवड झाली नाही, ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले गेले. सरफराजने आपल्या फिटनेसमध्ये सुधारणा केल्याचा दावा केला असतानाही त्याला सातत्याने संधी नाकारली जात असल्याने शमा मोहम्मद यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. माजी राष्ट्रीय निवड समिती सदस्याचे मत माजी राष्ट्रीय निवड समितीच्या एका सदस्याने सरफराजच्या निवडीबाबत आपले मत व्यक्त केले. न्यूज एजन्सी पीटीआयशी बोलताना ते म्हणाले, “सरफराजने मुंबई संघ व्यवस्थापन आणि ज्येष्ठ खेळाडू अजिंक्य रहाणेशी चर्चा करायला हवी. शक्य असल्यास त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा. तिथे त्याला नवीन चेंडू खेळण्याची संधी मिळेल. पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत राहिल्यास त्याला फारसा फायदा होणार नाही, कारण भारताकडे या स्थानांसाठी अनेक अष्टपैलू खेळाडूंचे पर्याय आहेत.” त्यांनी पुढे सांगितले, “रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा आणि नितीश रेड्डी हे सर्व अष्टपैलू खेळाडू उपलब्ध आणि तंदुरुस्त असतील, तर मधल्या फळीत त्यांना प्राधान्य मिळेल. रिषभ पंतला दुखापत झाल्यावर ध्रुव जुरेल पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. न्यूझीलंडविरुद्ध फिरकीपटूंसाठी अनुकूल खेळपट्टीवर सरफराज चार वेळा अपयशी ठरला, हेच त्याच्या संघाबाहेर राहण्याचे प्रमुख कारण आहे.” शमा मोहम्मद यांचा शमीबाबतचा यापूर्वीचा बचाव यापूर्वी शमा मोहम्मद यांनी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांचा बचाव केला होता. या वर्षी रमजानच्या काळात दुबईत झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत शमीने सेमीफायनल सामन्यानंतर एनर्जी ड्रिंक घेतल्याने अखिल भारतीय मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी त्याच्यावर रमजानदरम्यान रोजा न पाळल्याचा आरोप केला होता. यावर शमा मोहम्मद यांनी शमीची बाजू घेत म्हटले होते, “इस्लाममध्ये प्रवासादरम्यान रोजा ठेवण्याची सक्ती नाही. मोहम्मद शमी सध्या प्रवास करत आहे आणि तो एक खेळाडू आहे. खेळादरम्यान त्याला तहान लागणे स्वाभाविक आहे.” शमा मोहम्मद यांच्या या वक्तव्यमुळे क्रिकेट आणि राजकारण यांचा एक नवा वाद उभा राहिला आहे. सरफराज खानच्या निवडीबाबतचा त्यांचा प्रश्न आणि गौतम गंभीर यांच्यावरील आरोप यामुळे क्रिकेट विश्वात चर्चांना उधाण आले आहे. येत्या काळात या मुद्द्यावर निवड समिती किंवा गंभीर यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.