Gauri Sawant on Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनने नेहमीच वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांबरोबरच वेब सीरिजमधील तिच्या भूमिका देखील प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. तिची ‘ताली’ ही वेब सीरिज विशेष चर्चेत राहिली होती. ही वेब सीरिज सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित होती. आता श्रीगौरी सावंत यांनी ‘आरपार’ या कार्यक्रमाला दिलेल्या मुलाखतीत सुश्मिता सेनसोबत झालेल्या पहिल्या भेटीचा अनुभव सांगितला आहे. या आठवणी सांगताना त्यांनी सुश्मिता सेनच्या संवेदनशीलतेचं आणि धाडसाचं भरभरून कौतुक केलं आहे. “माझी भूमिका ती का करेल, असा प्रश्न पडला” श्रीगौरी सावंत म्हणाल्या, “निर्मात्यांनी मला विचारलं की तुमची भूमिका कोण साकारणार आहे, हे माहीत आहे का? त्यांनी सांगितलं की सुश्मिता सेन ही भूमिका करणार आहे. मी त्यांना विचारलं, कोण सुश्मिता सेन? ते म्हणाले, मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स. ते ऐकून मला प्रश्न पडला की एवढी मोठी अभिनेत्री माझी भूमिका का करेल?” पहिली भेट आणि साधेपणा पुढे सुश्मिता सेनला भेटायला गेल्याची आठवण सांगताना श्रीगौरी म्हणाल्या, “मी तिच्या घरी गेले होते. रिकाम्या हाती जायचं नको म्हणून पार्ले बिस्किट घेऊन गेले. तिने दरवाजा उघडला आणि मी काही वेळ फक्त तिच्याकडे पाहतच होते. पण तिने मला इतकं कम्फर्टेबल केलं की माझं दडपण लगेच कमी झालं.” “तुम्ही आई आहात, मीही आई आहे” “मी तिला विचारलं तुम्ही माझी भूमिका का साकारणार आहात? त्यावर ती म्हणाली, कारण तुम्ही एक आई आहात आणि मीही एक आई आहे. तिचं हे उत्तर माझ्या मनाला खूप भावलं. मी तिला साडी आणि पार्ले बिस्किट दिलं. पाण्यासोबत बिस्किट खा, छान लागतं असं मी तिला सांगितलं आणि तिने ते तसंच खाल्लं,” असं सांगत श्रीगौरी हसल्या. “विश्वसुंदरीने आमच्या समाजाला मान दिला” सुश्मिताच्या कामाबद्दल बोलताना श्रीगौरी सावंत भावूक होत म्हणाल्या, “ती सतत माझं निरीक्षण करायची. सुरुवातीला थोडं दडपण वाटायचं, पण नंतर मी जशी आहे तशीच वावरू लागले. ‘ताली’ ही ट्रान्सजेंडरवर आधारित पहिली बायोपिक आहे. विश्वसुंदरीने फक्त मला नाही, तर माझ्या संपूर्ण समाजाला मान दिला आहे. रस्त्यावरचा प्रत्येक तृतीयपंथी स्वतःला सुंदर समजतो. आमच्यातील ती सुंदरता तिने जगासमोर मांडली. ते धाडस तिने दाखवलं आहे.” सुश्मिता सेनने साकारलेली ही भूमिका केवळ अभिनय नव्हती, तर संपूर्ण समाजासाठी सन्मानाची बाब ठरली, असं श्रीगौरी सावंत यांनी यावेळी स्पष्ट केलं.