नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्याही मुद्द्यावर बोलताना, भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू आणि काँग्रेसचा सतत उल्लेख करण्याची सवय आहे. ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान त्यांनी नेहरूंचे नाव १४ वेळा आणि काँग्रेसचे नाव ५० वेळा घेतले. जेव्हा संविधानाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त चर्चा झाली तेव्हा नेहरूंचे नाव १० वेळा आणि काँग्रेसचे नाव २६ वेळा घेतले गेले, असे म्हणत कॉंग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. लोकसभेतील हिवाळी आधिवेशनाचा पहिला दिवस चांगलाच वादळी ठरला. यावेळी ‘वंदे मातरम’ या गीताच्या 150 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने लोकसभेत यावर चर्चा करण्यात आली. यामध्ये कॉंग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी पंतप्रधाना मोदी व सत्ताधारी पक्षांवर निशाना साधला. गौरव गोगोई यांनी दावा केला की, केवळ कॉंग्रेस पक्षाने वंदे मातरमला योग्य महत्त्व दिले. याबरोबरीने कॉंग्रेसने हे गीत केवळ राजकिय घोषणा राहू नये यासाठी, या गिताला राष्ट्रीय गीताचा देखील दर्जा दिला. रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६ मध्ये काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात पहिल्यांदा वंदे मातरम गायले होते. सरला देवी चौधराणी यांनी १९०५ च्या काँग्रेसच्या वाराणसी अधिवेशनात वंदे मातरम गायले होते. लोकसंख्येशी संबंधित गाण्यात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला. मूळ गाण्यात ७ कोटींचा उल्लेख होता, परंतु १९०५ च्या वाराणसी अधिवेशनादरम्यान, सरला देव चौधराणी यांनी ते बदलून ३० कोटी केले आणि संपूर्ण देशाला वंदे मातरमवर केंद्रित केले, असे ते म्हणाले.