शहरातील सर्वांत मोठी कारवाई : एकास अटक; एकावर गुन्हा
बारामती – येथे अवैध गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करीत ग्रामीण पोलिसांनी 30 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. बारामतीतील आतापर्यंत सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. याप्रकरणी दोघांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक केली आहे.
संतोष लक्ष्मण गायकवाड (रा वसंतनगर, बारामती,) व हरी दगडू नवले, (रा शिक्षक सोसायटी, कसबा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून नवलेला अटक केली आहे. याबाबतची माहिती अशी की, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना माहिती मिळाली की, संतोष गायकवाड व हरी नवले हे बारामती शहरामध्ये अवैधरित्या गुटख्याचा साठा करून बारामती शहरात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये तसेच खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विकत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या गोडाऊनची माहिती घेऊन पोलिसांनी सापळा रचला.
बारामती क्राईम ब्रॅंचचे प्रमुख चंद्रशेखर यादव यांनी इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह कसबा आणि वसंत नगर येथील गोडाऊनवर छापा टाकत नवलेला ताब्यात घेतले. तर हा गुटखा गायकवाडचा असल्याचे नवलेने सांगितले. कसबा येथील गोडाऊनमधून 18 लाख 99 हजार 700 रुपयांचा तर वसंतनगर येथील गोडाऊनमधून अंदाजे 11 लाख रुपयांचा असा 29 लाख 99 हजार 700 रुपयांचा गुटखा जप्त केला.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, पोलीस कर्मचारी सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, शर्मा पवार, भाऊसाहेब मोरे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, गणेश नांदे, सिद्धू पाटील, राजेश गायकवाड, रामदास जाधव यांनी कारवाई केली.