खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींसह आज बैठक
करोना रुग्णांसाठी बेड्स नियंत्रित ठेवण्याचे प्रयत्न
पुणे – करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेने पुन्हा एकदा रुग्णालयातील बेडची जमवाजमव सुरू केली आहे. खासगी रुग्णालयात किती बेड्स नियंत्रित करता येतील, या संदर्भातील महत्त्वाची बैठक मंगळवारी (दि.23) महापालिकेत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तसे पत्रही सर्व रुग्णालयांना पाठवण्यात आले आहे.
मागील एप्रिलपासून महापालिकेने बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये बेड्सचे नियोजन केले होते. सुमारे 80 टक्के बेड नियंत्रित करण्यात आले होते. मात्र बाधितांची संख्या कमी झाल्यानंतर ते बेड पूर्व नियोजित शस्त्रक्रियांना आणि अन्य रुग्णांना देण्याला महापालिकेने परवानगी दिली.
परंतु सद्यस्थितीत पुन्हा एकदा बाधितांची संख्या वाढत चालल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयांमध्ये बेड नियंत्रित करण्यात येत असल्याचे, महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांनी सांगितले.
मंगळवारी आयोजित बैठकीला येताना रुग्णालय प्रतिनिधींनी किती बेड वाढवणार आहेत याची माहिती रुग्णालयांनी सोबत आणायची आहे. त्यामध्ये ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड यांची माहितीही देणे आवश्यक आहे, असे आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांनी सांगितले.