नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील कोनासीमा जिल्ह्यात ओएनजीसीच्या (ONGC) एका तेलविहिरीतून मोठ्या प्रमाणावर गॅस गळती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गळतीमुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली असून, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. दुरुस्ती दरम्यान झाला स्फोट मिळालेल्या माहितीनुसार, कोनासीमा जिल्ह्यातील राजोल भागातील इरुसुमंडा गावात ओएनजीसीची एक तेलविहीर आहे. या विहिरीतून काही काळ उत्पादन बंद करण्यात आले होते आणि ‘वर्कओव्हर रिग’च्या सहाय्याने दुरुस्तीचे काम सुरू होते. दुरुस्ती सुरू असतानाच अचानक विहिरीत जोरदार स्फोट झाला. या स्फोटानंतर कच्चे तेल आणि गॅसचे मिश्रण हवेत शेकडो फूट उंचापर्यंत उडू लागले. गॅस गळतीनंतर आगीचे लोळ गॅस गळती सुरू झाल्यानंतर काही वेळातच विहिरीला भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट इरुसुमंडा आणि आसपासच्या परिसरात दाट धुक्याप्रमाणे पसरले. यामुळे स्थानिक रहिवासी आणि अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने तातडीने जवळची गावे रिकामी करण्याचे आदेश दिले. घटनेची माहिती मिळताच अनेक नागरिकांनी स्वतःहून घराबाहेर पडून सुरक्षित ठिकाण गाठले. लोक आपल्या पाळीव प्राण्यांना घेऊन सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाले आहेत. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना खालील सूचना दिल्या आहेत. विजेची उपकरणे चालू करू नका. विजेचा वापर पूर्णपणे टाळा. स्वयंपाकासाठी गॅस शेगडी किंवा चूल पेटवू नका, अशा सूचना दिल्या आहेत. ओएनजीसीचे तांत्रिक पथक आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून अधिकारी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.