सणासुदीच्या काळात गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये वाढ

नवी दिल्ली – महागाई वाढत असताना ऐन सनासुदीच्या काळात आता घरगुती गॅसही महाग झाला आहे. काही दिवसांपूर्वीच पेट्रोल-डिझेच्या दरांमध्येही वाढ झाली होती. विनाअनुदानित गॅसच्या दरांमध्ये आजपासून १५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. लागोपाठ दुसऱ्या महिन्यामध्ये विनाअनुदानित गॅसच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी मागील महिन्यात विनाअनुदानित १४.२ किलो गॅसच्या दरामध्ये १५ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली होती.
नव्या दरानुसार गॅस सिलेंडरच्या किमती –
दरम्यान, दिल्लीमध्ये आजपासून १४.२ किलो विनाअनुदानित गॅससाठी ६०५ रुपये मोजावे लागणार आहेत, तर कोलकात्यामध्ये ६३० रुपये द्यावे लागणार आहेत. मुंबई आणि चेन्नईमध्ये विना अनुदानित गॅससाठी अनुक्रमे ५७४.५० आणि ६२० रुपये मोजावे लागणार आहेत. १९ किलोच्या गॅसची किंमत दिल्लीमध्ये १ हजार ८५ रुपये झाली आहे. तर कोलकात्यामध्ये १ हजार १३९.५० रुपये, मुंबईमध्ये १ हजार ३२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये १ हजार १९९ रुपये द्यावे लागणार आहेत. सप्टेंबरमध्ये दिल्लीत १४.२ किलो विनाअनुदानित सिलेंडरचा दर ५९० रुपये होता. तर कोलकात्यात ६१६.५० रुपये होता. मुंबई आणि चेन्नईत १४.२ किलो विनाअनुदानित गॅस सिलेंडरचा दर अनुक्रमे ५६२ आणि ६०६.५० रुपये होता.





