Pune District : नारायणगावच्या प्रवेशद्वारावरील कचरा हटविला
Pune District : मागील आठवड्यात ‘दैनिक प्रभात’ने नारायणगावच्या प्रवेशद्वारावर निर्माण झालेले घाणीचे साम्राज्य तसेच वारुळवाडी येथील मीना नदी परिसरातील कचर्याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते.

नारायणगाव : नारायणगावची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणार्या मीना नदीच्या पात्रालगत तसेच नारायणगावच्या प्रवेशद्वारावर साचलेल्या कचर्यामुळे निर्माण झालेल्या अस्वच्छतेची अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेतली. उपसरपंच योगेश पाटे यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचार्यांकडून परिसराची स्वच्छता करून घेत कचरा हटविला.
मागील आठवड्यात ‘दैनिक प्रभात’ने नारायणगावच्या प्रवेशद्वारावर निर्माण झालेले घाणीचे साम्राज्य तसेच वारुळवाडी येथील मीना नदी परिसरातील कचर्याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत वारुळवाडी ग्रामपंचायतीने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून परिसरातील कचरा हटविला. मात्र, नारायणगावच्या प्रवेशद्वारावरील कचरा कायम असल्याने ग्रामपंचायतीच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. अखेर नारायणगाव ग्रामपंचायतीनेही कारवाई करून हा कचरा हटविला.
नारायणगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त प्रशासन स्वच्छतेला प्राधान्य देत असून, सकाळ-संध्याकाळ अशा दोन सत्रांत सहा घंटागाड्यांच्या माध्यमातून घराघरातून कचरा संकलित केला जात आहे. स्वच्छता दूतांच्या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मीना नदी परिसरातील काही व्यापारी आणि नागरिकांकडून नदीपात्रालगत तसेच परिसरात कचरा टाकला जात असल्याने स्वच्छतेच्या प्रयत्नांना बाधा येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
यापुढे मीना नदी परिसर, सार्वजनिक ठिकाणे, बसस्थानक, बाजारपेठ, कोल्हेमळा रोड आदी गजबजलेल्या ठिकाणी कचरा टाकताना कोणी आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर तसेच दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही आपली जबाबदारी पार पाडावी, कचरा घंटागाडीतच द्यावा आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
नारायणगाव शहर स्वच्छ ठेवणे ही प्रशासनाची जेवढी जबाबदारी आहे, तेवढीच जबाबदारी नागरिकांचीही आहे. ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छतेसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. मात्र, काही नागरिक जाणीवपूर्वक स्वच्छ केलेल्या ठिकाणी पुन्हा कचरा आणून टाकतात.
-योगेश पाटे, उपसरपंच नारायणगाव





