Pimpri : पीडब्ल्यूडी मैदानात कचर्याचे साम्राज्य

नवी सांगवी : नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचा ढिग पडून आहेत. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या घाणीत मोकाट जनावरे प्लॅस्टिक पिशव्यांसह टाकलेले खाद्यपदार्थ खात असल्याने त्याच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मैदानावर येणाऱ्या नागरिकांना यामुळे तोंडावर रुमाल बांधूनच यावे लागत लागत असून त्यांच्यात नाराजीचा सूर आहे.
या संदर्भात मनसेचे चिंचवड विधानसभा उपविभाग अध्यक्ष सुरेश हरिभाऊ सकट यांनी महापालिकेकडे कचरा उचलण्याची मागणी केली आहे. पिंपळे गुरवमधील साठ फूट रस्ता आणि मोरया पार्क परिसरातही हिच परिस्थिती असून, त्या ठिकाणी दोन शाळा असल्यामुळे लहान मुलांनाही कचरा आणि दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
पालिकेचे कर्मचारी कचरा दररोज उचलत नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असा आरोप सकट यांनी केला आहे. तसेच जर पालिकेने स्वच्छता केली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याविरोधात तीव्र आंदोलन उभारेल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.,
खाद्यपदार्थांचे पॅकेटही कचऱ्यामध्ये
पीडब्ल्यूडी मैदानाजवळ टाकलेल्या कचऱ्यामध्ये चटपटीत खाद्य पदार्थांची असंख्य पाकिटे देखील आहेत. या खाद्यपदार्थांची मुदत संपुष्टात आल्याने ती टाकल्याची शक्यता आहे. या मैदानावर गोरगरीब घरातील लहान मुले तसेच कचरावेचक मुले येतात. या मुलांनी ही पाकिटे फोडून खाल्ल्यास त्यांना विषबाधा होण्याची शक्यता नागरिकता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी उघड्यावर मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थांची पाकिटे टाकणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाईची मागणी देखील होत आहे.





