Ganpati Visarjan 2024 | आज अनंत चतुर्थीच्या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सवांबरोबर घरगुती गणपतींचे शांततेत विसर्जन होणार आहे. यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेने शहरांमधील २३ विसर्जन मिरवणूक मार्गांवर तब्बल १८० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांचे नियोजन पालिका आणि पोलिसांकडून करण्यात येणार आहे.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत २९३ सार्वजनिक गणपती आहेत. ४३ हजार ८०७ घरगुती गणपती आहेत. गेल्या अकरा दिवसाच्या कालावधीत दीड दिवसाचे, अडीच, पाच आणि सात दिवसांचे गणपती अशा एकूण २० हजाराहून घरगुती गणपतींचे विसर्जन झाले आहे. गणेश भक्तांना वाहन कोंडीचा त्रास न होता आपल्या घराच्या परिसरात गणपती बाप्पाचे विसर्जन करता यावे यासाठी पालिकेने कल्याणमध्ये तिसगाव नाका, गावदेवी मंदिर, चिंचपाडा, कोळसेवाडी पोलीस ठाणे,
बारावे मुंबई विद्यापीठ उपकेंद्र, डोंबिवलीत ठाकुर्ली येथील पंचायत बावडी, नेहरू मैदान, अयोध्या नगरी, शिवम रुग्णालय घरडा सर्कल जवळ, टिळकनगर विद्यामंदिर, दत्तनगर प्रगती महाविद्यालय, कस्तुरी प्लाझा, न्यू आयरे रस्ता, मोठागाव उदंचन केंद्र, आनंदनगर, भागशाळा मैदान येथे कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे.
गणपती विसर्जनासाठी एकूण ६८ विसर्जन घाट निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये ३७ ठिकाणे डोंबिवलीत, कल्याणमध्ये २७ आहेत. शहराच्या वेगळ्या भागात, विसर्जन मार्गांवर एकूण ८०० पोलीस आणि दोन राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत, असे पालिका, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
विसर्जन स्थळी प्रखर झोताचे दोन हजार ७३५ दिवे, ७० जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन मिरणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी १०३ वीजेचे दिवे असलेले मनोरे उभारण्यात आले आहेत. १८० सीसीटीव्ही विसर्जन मिरवणूक मार्गांवर नजर ठेवणार आहेत.