Ganpat Gaikwad Firing Case: गणपत गायकवाड यांच्या मुलाला अखेर पोलिसांकडून अटक

Ganpat Gaikwad : उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या प्रकरणानंतर आणखी एक अपडेट समोर आली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणी त्यांचा मुलगा वैभव गायकवाडसह दोघांना अटक केली आहे. मागील अनेक दिवसांपासून पोलीस दोघांचा शोध घेत होते. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनी ही कारवाई केली आहे. वैभव गायकवाडसह अटक करण्यात आलेला रणजित यादव हा आमदार गणपत गायकवाड यांचा वाहनचालक आहे.
गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता या प्रकरणात एकूण ९ जण पोलिसांच्या अटक केली आहे. हिल लाईन पोलीस स्टेशनमधील गोळीबार घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये गणपत गायकवाड यांच्या मुलाचाही समावेश दिसून आला. त्यामुळे पोलिसांकडून वैभवचा शोध सुरु होता. अखेर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, ठाण्यातील कळवा पोलीस स्टेशनच्या जेलमध्ये आमदार गणपत गायकवाड यांना ठेवण्यात आलं आहे. त्यांची कळव्यातील पोलीस स्टेशन मधील जेलमध्येच वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिल लाइन पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर आमदार गणपत गायकवाड यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.





