पिंपरी | मध्यप्रदेश, ओरिसातून होतेय गांजाची तस्करी

पिंपरी, (प्रतिनिधी) – शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गांजाच्या तस्करीला लगाम लावण्यात पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश आले आहे.
गेल्या २० महिन्यात मध्यप्रदेश, ओरिसातून आलेला तीन कोटी ९४ लाख ५२ हजार २९२ रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी १०३ गुन्हे दाखल करण्यात आले असून १४७ आरोपींना तुरूंगात पाठविले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात होत असलेल्या गांजा तस्करांचे कंबरडे मोडण्यात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश आले आहे. गेल्या वर्षी म्हणजे १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत या पथकाने तब्बल एक कोटी ४४ लाख ९३ हजार १३२ रुपयांचा गांजा जप्त केला.
याप्रकरणी ५७ गुन्हे दाखल करीत गांजा विक्री करणा-या ७५ जणांना अटक केली आहे. तर यंदाच्या वर्षी १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत दोन कोटी एक लाख ५६ हजार ९७० रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी ४६ गुन्हे दाखल असून ७२ आरोपींना अटक केली आहे.
गांजाचे सेवन करणा-यांवरही गुन्हा
२०२३ या वर्षात पोलिसांनी केवळ गांजाच पकडला असे नाही. तर गांजाचे सेवन करणा-या १९ जणांना अटक करून एकूण १५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यावेळी आरोपीकडून दीड हजार रुपयांचा गांजाही जप्त केला आहे.
या महिन्यातही पोलिसांची कामगिरी
शैक्षणिक परिसर तसेच हिंजवडीतील आयटी पार्क परिसरात गांजा विक्री करणा-या तीन जणांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.
सुरूवातीला त्यांच्या ताब्यातून साडेनऊ लाखांचा गांजा हस्तगत केला. पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात आरोपींकडून आणखी आठ लाख ५० हजारांचा असा एकूण १८ लाख रुपयांचा ३३ किलो गांजा जप्त केला.
धुळे मार्गे येतो गांजा
मध्यप्रदेश तसेच ओरिसामधून गांजाची तस्करी होत असल्याचे यापूर्वी केलेल्या तपासातून समोर आले आहे. हा गांजा मध्यप्रदेशच्या सीमेवरून धुळे जिल्ह्यात येतो. तेथून हा गांजा राज्याच्या विविध भागात तस्करी करून पाठविण्यात येतो.
या ठिकाणी द्या माहिती
आपल्याला अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी [email protected] या इ-मेल आयडीवर किंवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या 9422008804 या मोबाइल क्रमांकावर माहिती द्यावी.
तसेच नागरिकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक,(गुन्हे शाखा), पिल्ले सभागृहाजवळ, अजमेरा कॉलनी, पिंपरी 411018 या पत्त्यावरही गोपनीय माहिती पाठवू शकता. माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल. – संतोष पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक





