प्रभात वृत्तसेवा बारामती – कटफळ (ता. बारामती) येथील अवजारे बनवणाऱ्या एका उद्योजकाकडून स्वतःला ‘बारामतीचा डॉन’ असल्याचे सांगत वारंवार धमक्या देऊन ८५ हजार रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी फरार असलेला तिसऱ्या आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.फिर्यादी हे बारामती एमआयडीसी परिसरात अवजारे बनवणारी कंपनी चालवतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निरज रॉय, शुभम मोरे व भूषण रणसिंगे या तिघांनी ऑक्टोबर २०२४ पासून स्वतःला ‘बारामतीचे डॉन’ असल्याचे सांगत उद्योजकाकडून ऑनलाइन व रोख स्वरूपात वेळोवेळी पैसे उकळले. आरोपी फिर्यादीस बारामतीतील विविध हॉटेलमध्ये बोलावून दारूचे बिल भरण्यास भाग पाडत होते. एप्रिलपासून आरोपींनी, ‘तुला कंपनी चालवायची असेल तर महिन्याला पैसे द्यावे लागतील, नाहीतर तुला बारामतीत राहू देणार नाही’, अशा धमक्या देण्यास सुरुवात केली. १४ हजार रुपये दोनवेळा हप्त्यांत खंडणी घेतली. पेन्सिल चौक परिसरात फिर्यादीस अडवून ‘दारूचे बिल भर, नाहीतर हातपाय मोडीन’ अशी धमकी देत मारहाण केली. वंजारवाडी परिसरात आरोपींनी फिर्यादीकडून २० हजार रुपये ऑनलाइन मागवून धमकीखाली व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. १८ ऑक्टोबर रोजी रात्री अमरदीप हॉटेल येथे १३ हजारांची मागणी करत पुन्हा मारहाणीचा प्रयत्न केला. आरोपींनी एकूण ८५ हजार रुपयांहून अधिक रक्कम उकळली. ही बाब गांभीर्याने घेत बारामती तालुका पोलिसांनी फरार असलेल्या तिसऱ्या आरोपीस एमआयडीसी परिसरातून अटक केली. पुढील तपास सुरू असून न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील धनश्री भगत मनोज पवार राजू बन्ने ओंकार भोसले भारतीय खंडागळे रेणुका पवार यांनी केली.