पुणे : मोबाइल मनोऱ्याच्या ठेक्याचे पैसे घेण्यासाठी तरुणाचे अपहरण करून त्याला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या गुंड श्वेतांग निकाळजे याच्यासह साथीदारांना अटक करण्यात आली. निकाळजेकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले जप्त करण्यात आली. निकाळजेने मध्यस्थांमार्फत मध्य प्रदेशातील उमराटीतून पिस्तुले खरेदी केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. याप्रकरणी श्वेतांग भास्कर निकाळजे (वय ३७, रा. भीमनगर, मंगळवार पेठ), ओम संजय गायकवाड (वय २६, रा. मंगळवार पेठ) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे, खंडणी, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत एका तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार तरुणाचा खाद्यपदार्थ विक्रीचा स्टाॅल आहे. तो निकाळजेचा ओळखीचा आहे. मोबाइल मनोऱ्याचा ठेका, तसेच आर्थिक व्यवहारातून निकाळजेचा तरुणाशी वाद झाला होता. तरुणाचा विवाह ठरला हाेता. ८ नोव्हेंबर रोजी निकाळजे आणि साथीदारांंनी तरुणाचे राहत्या घराच्या परिसरातून अपहरण केले. त्याला मोटारीतून भोर परिसरात नेले. तेथे निकाळजेने त्याला पिस्तुलाचा धाक दाखविला, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेला तरुण आरोपींच्या तावडीतून पळाला. त्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. या गुन्ह्याचा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाकडून तपास करण्यात येत होता. निकाळजे आणि साथीदाराची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून निकाळजेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले जप्त करण्यात आली. पोलीस उपायुक्त मिलिंद माेहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, महेश बारावकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, मंगेश गायकवाड, किरण साबळे, मितेश चोरमले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, नीलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी ही कामगिरी केली.