पुणे : पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुद्धाचे सावट निर्माण झाले आहे. कोंढवा परिसरात झालेल्या भयंकर हल्ल्यात गणेश काळे (वय अंदाजे ३५) याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून आणि कोयत्याने वार करून निर्घृणपणे हत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, मृत गणेश काळे हा समीर काळे याचा भाऊ असून, समीर हा सोमा गायकवाड टोळीतील सक्रिय सदस्य आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, समीर काळे यानेच वनराज आंदेकरच्या खुनात वापरलेली पिस्तुले मध्य प्रदेशातून आणली होती. सध्या समीर काळे कारागृहात असून, त्याचा भाऊ गणेश याची आज हत्या करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांमध्ये परस्पर संबंध असण्याची शक्यता तपासली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश काळेवर सहा राऊंड गोळीबार करण्यात आला असून, त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. गंभीर जखमांमुळे गणेश काळेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी कारने घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांना घटनास्थळावरून तीन रिकामे कारतूस आणि एक पिस्तुलाचा खोका मिळाला आहे. गुन्हे शाखा आणि आंबेगाव पोलिस ठाण्याचे पथक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. सदर प्रकरणात काही साक्षीदारांची चौकशी सुरू असून, हल्ला पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.