प्रभात वृत्तसेवा उरुळी कांचन – उरुळी कांचन नजीक असलेल्या शिंदवणे (ता. हवेली) येथील काढणीस आलेल्या भगवा जातीच्या डाळिंबाची रातोरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. हवेली तालुक्यातील शिंदवणे येथील प्रगतशील शेतकरी गुरुनाथ मचाले यांच्या शेतात हि घटना घडली आहे. ऐवजाच्या चोरीसह आता डाळिंबाची चोरी होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.मचाले यांची शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत शेती आहे. या शेतात त्यांची स्वतःची अडीच एकर डाळिंब बाग आहे. यातील 250 झाडांवरील डाळिंब पिक काढणीस आले आहे. तर बाकीच्या झाडावरील पिक हे लहान आहे. गुरुवारी दुपारी डाळिंब पिकावर फवारणी केली व ते पिक पाहून घरी निघून गेले होते. त्यांनी फवारणी केली असल्याने त्यांना झाडांवरील काही मोठी डाळिंब विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे काढणी योग्य असलेले डाळिंब पिक पुढील दोन तीन दिवसांत डाळिंब विक्रीसाठी पाठवले जाणार होते.नेहमीप्रमाणे मचाले शेतातील डाळिंब बागेत पाहणी करीत असताना काही झाडांवर डाळिंब पिक कमी झालेले दिसून आले. त्यांनी बागेत फिरून पाहणी केली असता तब्बल एक ते दीड टन डाळिंब कमी असल्याचे दिसून आले. यावरून डाळींबावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याचे लक्षात आले. दरम्यान, डाळिंबाला बाजारात प्रती किलो 150 रुपयांपासून ते 400 रुपयांपर्यत असा चांगला भाव मिळत आहे. हीच नामी संधी चोरट्यांनी साधून काढणीस आलेले 1 ते दीड टन डाळिंब रातोरात चोरून नेले आहे. त्यामुळे शेतकरी गुरुनाथ मचाले यांचे मोठे नुकसान झाले आहे. “शिंदवणे हद्दीत डाळिंब पिकाची शेती आहे. 250 झाडांवरील काही डाळिंब काढणीस आले होते. उद्या किंवा पर्वा तोडणी करून बाजारात विक्रीसाठी दाखल करणार होतो. मात्र आदल्या दिवशीच अज्ञात चोरट्यांनी यावर डल्ला मारला. यामुळे कमीत कमी 1 ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेने शेतकर्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून उरुळी कांचन पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.” -गुरुनाथ मचाले, शेतकरी शिंदवणे विद्युत केबलची चोरी.. शिंदवणे परिसरात असलेल्या काळेशिवार परिसरात मुळा मुठा कालव्यालगत शेती असलेले शेतकरी राजेंद्र कांचन, सचीन घारे, शिवाजी महाडिक, संभाजी महाडिक, सोपान महाडिक या शेतकर्यांच्या 50 हजार रुपये किमतीची विद्युत केबलची अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे.