वाशिम हादरलं ! भर दिवसा 8 ते 10 जणांच्या टोळक्याकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या

वाशिम : वाशिममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये वाशिम शहरातील पोलीस स्टेशनच्या मागील भिंती लगतच भर दिवसा 8 ते 10 जणांच्या टोळक्याने एका तरुणाची सपासप चाकूने वार करून निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
शहरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, पोलीस स्टेशनच्या भिंतीजवळच या तरुणाची हत्या करण्यात आली. राहुल वाघ असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल वाघ हा वाशिमच्या एका खाजगी दवाखान्यात काम करत होता अशी माहिती समोर आली आहे. एका टोळक्याने राहुलला गाठलं आणि मारहाण सुरू केली. वाद इतका विकोपाला गेला की, या टोळक्याने राहुल वाघ याच्यावर चाकूने सपासप वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत राहुल उठून उभा राहिला आणि चालत – चालत 50 ते 60 फूट पुढे जाऊन कोसळला.
या हत्यानंतर अज्ञात आरोपीनी बाईकवरून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाशिम पोलीस, फॉरेन्सिक पथक दाखल झालं. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. राहुलचा खून नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.





