बांगलादेशी घुसखोरांना आधार कार्ड मिळवून देणारी गॅंग उघड; 9 जणांच्या टोळीला केले जेरबंद

बेंगळूरू – बांगलादेशी घुसखोरांना आधार कार्ड मिळवून देणाऱ्या 9 जणांच्या गॅंगचा पर्दाफाश करण्यात बेंगळूरु पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा आणि फार्मासिस्टचाही समावेश आहे. ही गॅंग देशात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना आधार कार्ड आणि नागरिकत्वाशी संबंधित अन्य सुविधा पुरवण्याचे काम करत असे. या टोळीने एका वर्षात 4 कोटी रुपयांचे रुपांतर बांगलादेशी चलनामध्ये केले आणि ही रक्कम बांगलादेशात पाठवून दिली होती, असे पोलिसांनी सांगितले.
या वर्षी 15 एप्रिलला चिकागोलारहाटी या गावातील एटीएममधून 18 लाख रुपये लुटून नेण्यात आले होते. या संदर्भात पोलिसांनी शेख इस्माईल किताब अली नावाच्या बांगलादेशीला अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने सय्यद अकून उर्फ शाहिद अहमद या अन्य एका बांगलादेशी घुसखोराची माहिती दिली.
अकून हा त्रिपुरामार्गे भारतात घुसला आणि भंगार, प्लॅस्टिकचा व्यवसाय सुरू केल्याचेही इस्माईलने सांगितले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अकूनच्या मुलालाही अटक केली. या सर्वांकडे चकशी केल्यावर यामध्ये अधिक जण सहभागी असल्याचे समजले. त्यांच्या म्होरक्याला अटक केल्यावर खोट्या कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड मिळवून देणारी एक टोळीच सक्रिय असल्याचे उघड झाले.
यामध्ये सहभागी असलेला राकेश हा करोनाच्या साथीच्या काळात बेरोजगार झालेला तरुण आहे. तो राजपत्रित अधिकाऱ्यांची बनावट पत्रे तयार करत असे. तर बीबीएमपी रुग्णालयात हंगामी कर्मचारी असलेल्या इशतिया हा बनावट कोविड निगेटिव्ह रिपोर्ट आणि अन्य बनावट कागदपत्रे तयार करत असे.
पोलिसांनी सांगितले की त्यांनी आरोपींकडून चार ई-श्रम कार्ड, पाच ड्रायव्हिंग लायसन्स, तीन आयुष्मान भारत हेल्थ कार्ड, दोन एटीएम कार्ड, तीन मतदार ओळखपत्र अर्ज-6, आधार नोंदणी, अपडेट फॉर्मसाठी 92 प्रमाणपत्रे बीबीएमपी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सीलसह बीबीएमपी रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांचे पाच शिक्के, बनावट शिक्के तयार करण्यासाठी 26 बनावट लेटरहेड, 16 मोबाईल फोन, तीन सीपीयू, दोन लॅपटॉप, दोन प्रिंटर, 31 आधार कार्ड, 13 पॅन कार्ड, 28 मतदार ओळखपत्रे जप्त केली आहेत.





