मुंबई : राज्यात सगळीकडेच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन झाले आणि त्यानंतर आज अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मानाचे गणपती विसर्जित होत आहेत. दुसरीकडे राज्यात सगळीकडे पावसाची हजेरी लागली आहे. त्यातच आता मुंबई आणि पुण्यात विसर्जन मिरवणुकीत पावसाने हजेरी लावली आहे.
आज सकाळपासून मुंबई आणि परिसरात बाप्पाच्या विसर्जनाला उत्साह पहायाला मिळाला. दरम्यान, दुपारनंतर आता विसर्जन मिरवणुकीवर वरून राजाने कृपादृष्टी झाली आहे. मुंबईत दुपारी साडेतीनच्या सुमारास ढग दाटून येऊन तुफान पाऊस कोसळला. विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अंधेरी, गोरेगाव, दादरसह गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpatty) परिसरात पावसाचा जोर पाहायला मिळाला.
मुंबईत भर दुपारी अंधार पसरला. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट पाहायला मिळाला. या भर पावसातही अनेक गणेश मंडळांनी आपल्या मिरवणुका चालूच ठेवल्या. मुंबईच्या रस्त्यांवर कार्यकर्त्यांची गर्दी आणि कोसळणारा पाऊस असं चित्र होतं. अंधेरी परिसरात पावसाचा जोर इतका होता की त्यामुळे दृष्यमानताही कमी झाली. त्याशिवाय विजांचा कडकडाटही भीतीदायक होता. तर तिकडे पुण्यातही मुंबईप्रमाणे परिस्थिती पाहायला मिळाली. दिवसा अंधार पाहायला मिळाला. त्यामुळे यंदा पाऊसच लवकर मिरवणूका संपवणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
Thunderstorm alert for #Mumbai for next 2-3 hours ⚠️
Panvel, Navi Mumbai will get intense rain as a fresh thunderstorm has developed near the ghats
Central line near Thane, will get heavy rain in next hour ⛈️Expecting 30-40 mm in an hour, rain will be more in the interiors.… pic.twitter.com/avqmRtKeoG
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) September 28, 2023
दरम्यान, तिकडे दादर चौपाटीवरही मुसळधार पाऊस कोसळला. एकीकडे गणपती विसर्जनासाठी गणेश मंडळांची धामधूम सुरु होती. त्यातच मुसळधार पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. एकीकडे गणेश विसर्जन होत असताना दुसरीकडे मुंबईत पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली. दादर परिसरात गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची संख्या मोठी आहे. जोरदार पाऊस कोसळत असताना सुद्धा मुंबईकरांचा उत्साह मात्र मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. यंदा समुद्र चौपाटीवर सर्वसामान्य नागरिकांना जायला बंदी करण्यात आली असून, मुंबई महानगरपालिकेचे जीव रक्षक दलाचे कर्मचारी गणपती बाप्पाची मूर्ती हातात घेऊन स्वतः समुद्रात जाऊन विधिवत विसर्जन करत आहेत.
दरम्यान, हवामान विभागाने आज राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार दुपारनंतर राज्याच्या विविध भागात पाऊस बरसला. महाराष्ट्रात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मुंबईत जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज होता. तो वरुणराजाने खरा ठरवला.
याशिवाय कर्नाटक, गोवा आणि केरळ किनारपट्टी भागात हलका तो जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.