दुकानदारांना ग्राहकांची प्रतीक्षा : सजावटीच्या साहित्याची खरेदी कमी
पिंपरी – लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचा आवडता गणेशोत्सव सण दोन दिवसावर आला असल्याने शहरातील बाजारपेठ गणपती सजावट साहित्यांनी गजबजून गेल्या आहेत. मात्र, यावर्षी दरवेळी गणेशोत्सवामध्ये दिसणारा नागरिकांचा उत्साह काही प्रमाणात मावळला असल्याचे दिसून येत आहे. वाढलेली महागाई आणि बाजारात निर्माण झालेल्या मंदीमुळे गणेशोत्सवात खरेदीला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. सजावटीच्या साहित्याची विक्री दरवर्षीच्या तुलनेत अद्याप निम्मी देखील झाली नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.
सध्या बाजारात गणेशमूर्तींच्या विक्रीबरोबरच सजावटीचे साहित्यही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात लहान मूर्तींसोबतच सार्वजनिक गणेश मंडळासाठी मोठ-मोठ्या मूर्तीही विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
यावर्षी गणेशमूर्तींच्या किंमतीमध्ये 30 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गणेशमूर्तींच्या किंमतीमध्ये वाढ झाली असली तरी गणेशमूर्तीची मागणीही वाढली आहे. त्यामुळे, सध्या तरी गणेशमूर्तींच्या विक्रीवर फारसा परिणाम झालेला नाही. मात्र, बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी ठेवलेले विविध प्रकारचे कापडी मंडप, सुगंधी अगरबत्ती, विविध प्रकारचे हार, यासोबतच विविध प्रकारच्या आकर्षक चायनीज वस्तू यांची विक्री मात्र मोठ्या प्रमाणात घटली आहे.
तसेच दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी बाजारपेठेमध्ये निर्माण होणारा उत्साह यावर्षी मात्र मोठ्या प्रमाणात मावळला असल्याचे दिसत आहे. सध्या बाजारात दुकाने विविध साहित्यांनी सजली असली तरी दुकानदारांना मात्र ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बाजारात वर्दळ नाही
गणरायाच्या पाठोपाठ गौरींचेही आगमन होत असते. यामुळे इतरही किराणा मालाला चांगली मागणी असते. गणेशोत्सवापूर्वीच किराणा व भुसार मालांच्या दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र, यावर्षी कडधान्य, साखर, तेल यांच्याही किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे, या वस्तूंचीही अपेक्षित विक्री होत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. पूजा साहित्यांच्या विक्रीसाठी दुकाने सजली असली तरी या दुकानात वर्दळ जाणवत नसून विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे.
“मेड इन चायना’ चेच वर्चस्व
यावर्षी गणेशोत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठेमध्ये आरासच्या माळा, मकर झुरमाळ्या, कारंजे, विद्युत माळा, तैवानचे दिवे, यासह वेगवेगळ्या चायनीज लाईट्सने बाजारपेठ भरुन गेली आहे. चायनीज दिवे, लायटिंग, फोकस दिवे आदी वस्तू बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत. स्थानिक वस्तूंपेक्षा यंदाही बाजारावर “मेड इन चायना’ चेच वर्चस्व अधिक दिसून येत आहे.
60 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत उपलब्ध असलेल्या विविध वस्तूंनाही मागणी नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. गौरीसाठी विविध प्रकारचे दागिन्यांचे सेट, विविध प्रकारचे हार, मंगळसूत्र असे साहित्य विक्रीसाठी आलेले आहे. 50 रुपयांपासून ते 1 हजारापर्यंत या माळा विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
काय आहे कारण
यावर्षी गणरायांचे आगमन सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला होत आहे. उद्योगनगरीतील बहुतेक कंपन्या कामगार व कर्मचाऱ्यांना सात तारखेला किंवा त्यानंतर पगार देतात. यामुळे आगमनाची वेळ यंदा महिना अखेरीची आहे. तसेच गेल्या चार महिन्यांपासून वाहन उद्योगात आलेल्या मंदीचा शहरातील लाखो कामगारांनाही फटका बसला आहे. गेल्या तीन महिन्यापासून बहुतेक कंपन्यांमधील कामगारांचा ओव्हरटाईम बंद असल्यामुळे सण-उत्सवात खर्च करण्यासाठी पुरेशी रक्कम हाती नसल्याचाही परिणाम यंदा जाणवत आहे.