Pimpri : हरितालिका पूजेसह गणेशोत्सवाच्या खरेदीला वेग

पिंपळे गुरव : गणेशोत्सव केवक काही तासांवर आला असून पिंपरी-चिंचवडमधील भोसरी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, प्राधिकरण, सांगवी, वाकड आदी प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवसभर मोठी गर्दी पाहायला मिळाली. सायंकाळनंतर नागरिक सहकुटुंब खरेदीसाठी बाहेर पडले होते. बाजारपेठांत उत्सवी वातावरण असून रात्री उशिरापर्यंत खरेदीचा जल्लोष सुरू राहिला. बुधवारी (दि. २७) लाडक्या गणरायाचे आगमन होत असल्याने शहरातील घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पांच्या स्वागताची लगबग सुरू झाली आहे.
गणेशोत्सवाबरोबरच मंगळवारी (दि. २६) होणाऱ्या हरितालिका पूजेसाठी महिलांची बाजारपेठांत विशेष लगबग दिसून आली. पूजेसाठी लागणाऱ्या पाने, फुले, अगरबत्ती, अत्तर, तूप, वाती, अष्टगंध, कलश, पिठाचे गणपती, मुखवटे आणि विविध सजावटीचे साहित्य खरेदीसाठी महिलांनी बाजारपेठ गजबजून टाकल्या.
गौरी सजावटीच्या साहित्याची रेलचेल
रविवारी (दि. ३१) गौरी प्रतिष्ठापना असल्याने गौरी-गणपतीच्या सजावटीसाठीची साहित्ये, कृत्रिम दागिने, झगमगत्या माळा, विजेचे सजावटी दिवे, कमानी, तोरणे, पारंपरिक वस्तू आणि पूजेसाठी लागणाऱ्या धूप, कापूर, फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शाहूनगर, चिखली, पिंपळे सौदागर, भोसरी आणि निगडी प्राधिकरण भागातील बाजारपेठांत दिवसभर ग्राहकांची झुंबड उडाली.
गणेशमूर्ती बुकिंगला प्रचंड प्रतिसाद
शहरातील बाजारपेठांमध्ये गणेशमूर्तीच्या बुकिंगसाठी नागरिकांची विशेष लगबग दिसून येत आहे. यंदा गर्दी टाळण्यासाठी तसेच सुबक मूर्ती मिळावी यासाठी नागरिकांनी आगाऊ बुकिंगकडे कल दर्शविल्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील गणेश मूर्ती विक्रेत्यांकडे सुमारे ९० टक्के गणेशमूर्तींचे बुकींग पूर्ण झाले आहे.
सोन्याच्या दागिन्यांवरही ग्राहकांचा भर
बाप्पांच्या अलंकारांसाठी तसेच हरितालिका पूजेसाठी सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीलाही नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पिंपरी कॅम्प, चिंचवड स्टेशन, भोसरी भागातील सराफ बाजारपेठांमध्ये दिवसभर खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
फळे व प्रसादसामग्रीच्या खरेदीसाठी गर्दी
निगडी प्राधिकरण, भोसरी, आकुर्डी, पिंपरी मार्केट, थेरगाव, रहाटणी आणि चिंचवड येथील फळबाजारांत पूजेसाठी लागणारी फळे, नैवेद्य, प्रसादसामग्री खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठ फुलून गेल्या होत्या. प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक संध्याकाळी मंदावली होती.





