लाखणगांव -आंबेगाव तालुक्यात शनिवारी (दि. 22) गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने करण्यात आली. दरवर्षी ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक वाद्यांच्या साथीने होणारे गणरायाचे आगमन यावर्षी वाद्यांच्या आवाजाविना झाले होते.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सवावर अनेक निर्बंध घातले आहेत, त्यामुळे सर्वत्र नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने उत्सव सुरू झाला आहे. उत्सवाची सुरुवात गणरायाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेने होत असते. कोणत्याही प्रकारची मिरवणूक न काढता गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना साध्या पद्धतीने करण्यात आली. प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सव साजरा करताना अनेक निर्बंध घातले असल्याने त्याचे पालन गणेश भक्तांच्या वतीने करण्यात येत आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येणार असल्याने सर्वत्रच गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत आहे. दरवर्षी होणारे मोठमोठे सांस्कृतिक कार्यक्रम यावर्षी होणार नाहीत, त्यामुळे हे कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांवरही बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
गणेशमूर्ती खरेदी केल्यानंतर ती नेण्यासाठी ट्रॅक्टर, चारचाकी वाहने येथे दिसली नाही.त्याचप्रमाणे वाजंत्री, गणेशोत्सवास लागणारे साहित्य पुरवणारे व्यापारी, व्यावसायिकांचेही आर्थिक नुकसान झाले आहे.