प्रभात वृत्तसेवा जांबूत – शिरूर आणि जुन्नर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर यापुढे अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना सुरू आहेत. जे बिबटे नरभक्षक असतील, त्यांना ऑन द स्पॉट शूट करा, असे स्पष्ट आदेश राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज वनविभागाला दिले. ते बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या रोहन बोंबे, शिवन्या बोंबे आणि भागुबाई जाधव यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर बोलत होते. मंत्री नाईक यांनी यावेळी बोलताना सांगितले की, बिबट्याचा प्रश्न राज्याच्या अनेक भागांत उद्भवला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी प्रत्येकी अकरा कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या अतिसंवेदनशील भागासाठी सुमारे १२०० पिंजऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून, पिंजरे उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. हे सर्व बिबटे जेरबंद करेपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी. जुन्नरच्या माणिकडोह बिबट निवारण केंद्रातून वीस बिबटे तातडीने गुजरात येथील ‘वनतारा’सह इतर देशांना पाठविण्यात येणार आहेत. या संबंधित अधिकारी आज माझ्यासोबत आहेत. यावेळी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, सहायक वन संरक्षक स्मिता राजहंस, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, माजी अध्यक्ष देवदत्त निकम, माजी जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, उद्योजक किसनराव उंडे, सावित्रा थोरात, गणेश कवडे, बाळासाहेब डांगे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन.. रोहन बोंबे यांच्या दुर्दैवी घटनेनंतर संतप्त जमावाकडून वनविभागाचे वाहन व कार्यालय जाळण्यात आले होते, तसेच ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्ग अडवून रास्ता रोको केला होता. याप्रश्नी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावर वनविभाग याबाबत गुन्हे दाखल करणार नसून आंदोलनातील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे निर्देश पोलिसांना देऊ, असे आश्वासन यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.