मिरवणुकीचा खर्च टाळून गणेश मंडळाची रुग्णाला मदत

पिंपरी – दोन वर्षांच्या कालखंडानंतर गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. मात्र, काळेवाडी येथील आझाद मित्र मंडळ स्पोर्ट क्लब मंडळाने विसर्जन मिरवणुकीचा खर्च टाळून रुग्णाला आर्थिक मदत करत सामाजिक संदेश दिला आहे.
आझाद मित्रमंडळ स्पोर्ट क्लब मंडळाचे यंदाचे 35 वे वर्षे आहे. मंडळ गेल्या 35 वर्षांपासून सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन गणेशोत्सव साजरा करत आहे. गेल्या तीन वर्षांपासून मंडळ पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करत आहे. मंडळाची मूर्तीही पर्यावरण पूरक असते. यंदा मंडळाने “कचरा घर मे, या दिमाग मे’ हा स्वच्छतेचा संदेश देणारा देखावा सादर केला आहे. तसेच कृत्रिम हौद तयार करून तेथेच मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.
मंडळाचे संस्थापक पैलवान काळूराम नढे म्हणाले की, मंडळाने यंदा विसर्जन मिरवणुकीचा खर्च टाळून 11 हजार रुपयांचा निधी एका रुग्णाला आर्थिक मदत केली आहे. परिसरातील एक नागरिक आजारी असून त्यांना आर्थिक मदतीची गरज होती, त्यांना मदत करण्यात आली.





