आळंदीत रामकृष्णहरि नाम जप सप्ताहाची सांगता

आळंदी – आळंदी (ता. खेड) येथील गणेश महाराज फड वारकरी आश्रमातील रामकृष्णाहरि नाम जप सप्ताहाची शनिवारी (दि. 30) काल्याच्या किर्तनाने सांगता झाली. 24 ते 30 एप्रिल दरम्यान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
रमाकांत शास्त्री यांचे सकाळी 10 ते 12 यावेळेत काल्याचे कीर्तन झाले. तत्पूर्वी श्री ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथाचे पूजन करण्यात आले. शुक्रवारी (दि. 29) सायंकाळी वारकरी आश्रम ते चांगदेव महाराज विश्रांतीवड ग्रंथ दिंडी काढण्यात आली. सुरेखाताई मेटे यांचे जागराचे कीर्तन झाले. सप्ताहाचे हे 13 वे वर्ष होते. काकड आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, संत तुकाराम गाथा भजन, भावार्थ रामायण, हरिपाठ, रामकृष्णाहरी जप, हरिजागर आदी दैनंदिन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहात परभणी जिल्ह्यासह विविध भागातील भाविक उपस्थित होते. बाल गोपाळ, महिला, पुरुष सात दिवस हरिनाम गजरात भक्ती सागरात न्हाऊन निघाले होते.





