Ganesh Bidkar : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाकडे भक्कम संख्याबळ असल्याने पुणे विधान परिषदेची जागा भाजपलाच मिळावी, अशी मागणी महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया २५ मेपासून सुरू होत असून, त्याआधीच जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेल्या सदस्यांच्या आकडेवारीनुसार भाजपकडे ३०९ सदस्य आहेत. याशिवाय दौंड येथील नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडीचे १७ तसेच इंदापूरमधील कृष्णा भीमा विकास आघाडीचे ७ सदस्य भाजपला पाठिंबा देणारे आहेत. त्यामुळे भाजपकडे एकूण ३३३ सदस्यांचे संख्याबळ आहे. त्यामुळे पुणे विधान परिषदेची जागा भाजपकडेच राहणे अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या अनुभवाचा विचार करून पक्षश्रेष्ठींनी आपल्या उमेदवारीचा विचार करावा असेही ते म्हणाले. महापालिकेत अनेक वर्षे नगरसेवक म्हणून काम केले असून पक्षाने तीन वेळा गटनेता म्हणून जबाबदारी दिली. यामुळे कार्यकर्त्यांचे जाळे आणि संघटनात्मक ताकद आपल्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले.