नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या सैनिकांना समर्पित स्मारक नुतनीकरणानंतर पर्यटकांसाठी रविवारपासून खुले करण्यात आले आहे. 15 जून 2020 च्या रात्री एलएसीवरील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याशी झालेल्या हिंसक चकमकीत वीस सैनिक शहीद झाले होते. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी हे स्मारक बांधण्यात आले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. हे स्मारक दुरबुक-श्योक-दौलत बेग ओल्डी (डीएस-डीबीओ) रस्त्यावर, किलोमीटर-१२० पोस्टजवळ आहे. लष्करी तैनातीसाठी हा परिसर जगातील सर्वात कठिण मानला जातो. हे स्मारक भारत रणभूमी दर्शन या योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आले आहे. रक्तरंजित गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या स्मारकाची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी या स्मारकाच्या नूतनीकरणाला सुरुवात झाली. आता स्मारकाचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर हे स्मारक आता पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. गलवानपासून सुमारे 100 किमीवर या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. या स्मारकापासून गलवानकडे जाणाऱ्या मार्गावर पर्यटकांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. हे स्मारक लाल आणि काळ्या ग्रॅनाइट दगडांपासून बनवले आहे. त्याची रचना त्रिशूळ आणि डमरूच्या आकारात आहे. मध्यभागी एक त्रिकोणी रचना ऊर्जा आणि पर्वतांचे प्रतीक आहे. त्याच्या जवळ अमर ज्योती आणि राष्ट्रध्वज देखील स्थापित केला आहे. गलवानमध्ये शहीद झालेल्या सैनिकांचे प्रतीक असलेल्या स्मारकाभोवती वीस कांस्य पुतळे स्थापित करण्यात आले आहेत. येथे एक संग्रहालय आणि डिजिटल गॅलरी देखील विकसीत आली आहे.