Gadchiroli News : नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त; सी-60 जवानांच्या मोहिमेला यश

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी कारवायांवरही सुरक्षा दलाकडून मोहिम राबवली जात आहे. भामराकडजवळ नक्षलवादी कारवायांसाठी उभारण्यात आलेला तळ गडचिरोली पोलिसांनी आज उद्ध्वस्त केला आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळील कवंडे परिसरात नक्षलवाद्यांच्या भामरागड दलाने घातपात घडवण्यासाठी तळ उभारला होता. मात्र, हा तळ उद्ध्वस्त करण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश आले. गोपनीय माहितीच्याआधारे अपर पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-60 चे सुमारे 200 जवान विशेष अभियानावर होते.
दरम्यान, आज सकाळी जंगल परिसरात शोध घेत असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी, सी-60 जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. ही चकमक तीन वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास दोन तास चालू होती. चकमकीनंतर परिसरात करण्यात आलेल्या शोधमोहिमेत एक स्वयंचलित इन्सास रायफल, एक सिंगल शॉट रायफल, एक मॅगझीन, जिवंत काडतुसे, डिटोनेटर, रेडिओ, तीन पिट्टु (सामानाची पिशवी), वॉकीटॉकी चार्जरसह मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य आणि वैयक्तिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.





