Gadchiroli News : कटेझरी ते गडचिरोली बससेवा सुरू; 10 ते 12 गावांना होणार लाभ

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि माओवादग्रस्त भागातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध झाली आहे. स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनी पहिल्यांदाच कटेझरी ते गडचिरोली बससेवा सुरू करण्यात आली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांमुळे ही सेवा शक्य झाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांनी बससेवेचे उद्घाटन केले.
पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली. या बससेवेमुळे परिसरातील १० ते १२ गावांतील नागरिकांना लाभ होणार आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी येण्या-जाण्याची सोय होणार आहे. यापूर्वी १ जानेवारी २०२५ रोजी गट्टा ते गर्देवाडा आणि वांगेतुरी बससेवा सुरू करण्यात आली होती.
मागील पाच वर्षांत दुर्गम भागात ४३४.५३ किलोमीटर लांबीचे १८ रस्ते आणि ५९ पुलांचे बांधकाम पोलीस संरक्षणात पूर्ण करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून ही बससेवा सुरू झाली. अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे आणि पोलीस उप-अधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.





