Gadchiroli News : गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई ! 5 नक्षलवाद्यांना अटक

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा येथे घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या ५ जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. यात एका विभागीय समितीच्या महिला सदस्याचा समावेश आहे. या सर्वांवर महाराष्ट्र शासनाचे एकूण ३६ लाखांचे बक्षीस होते. उंगी मंगरु होयाम ऊर्फ सुमली (२८, छत्तीसगड), पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी (१९, छत्तीसगड), देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता (१९, छत्तीसगड) अशी अटक केलेल्या नक्षलवाद्यांची नावे असून उर्वरित दोघांच्या वयाबाबत शंका असल्याने त्यांची नावे जाहीर करण्यात आली नाही.
नक्षलवाद्यांचा टीसीओसी कालावधी सुरु असल्याने यादरम्यान ते घातपात घडवून आणतात. नक्षलवाद्यांचे गड समजले जाणाऱ्या अबुझमाड परिसरात येत असलेल्या भामरागड तालुक्यातील बिनागुंडा या अतिसंवेदनशील गावात ५० ते ६० च्या संख्येने नक्षलवादी एकत्र आले होते. पोलीस अधीक्षक नीलोत्पल याना ही गोपनीय माहिती मिळताच त्यांनी पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वात सी-६० चे ८ पथक आणि सीआरपीएफ तुकडीला अभियानासाठी १८ मे रोजी रवाना केले.
दरम्यान, १९ मे रोजी सुरक्षा जवानांनी बिनागुंडा गावाला वेढा घातला. यावेळी काही बंदूकधारी नक्षलवादी घातपाताची योजना आखत असल्याचे आढळून आले. मात्र, ते गावात असल्याने पोलीस जवानांनी गोळीबार न करता मोठ्या शिताफिने त्यातील पाच नक्षलवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून एक स्वयंचलित एसएलआर रायफलसह एक ३०३ रायफल, तीन एसएसआर रायफल, दोन भरमार असे एकूण ७ बंदूका व मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमधून दोघे अल्पवयीन असल्याचा संशय असल्याने त्यांच्याबद्दल अधिक माहिती देण्यात आली नाही. उर्वरित तीन महिला नक्षलवादी आहेत.





