छत्तीसगड : भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश आले आहे. 70 हून अधिक गुन्हे करुन फरार असणाऱ्या माओवाद्याला ठार करण्यात जवानांना यश आले आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर जवानांनी मोठी कारवाई केली. ठार करण्यात आलेल्या माओवाद्यावर 75 लाख रुपयांचं बक्षीस होते तसेच तो मागच्या 20 वर्षांपासून जवानांना चकमा देत होता.
ठार करण्यात आलेल्या माओवाद्याचे नाव रुपेश मडावी आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून सहा किलोमीटर अंतरावर अबूझमाडच्या जंगलात छत्तीसगडच्या सुरक्षा दलांसोबत काल झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले होते. त्यामध्ये रुपेश मडावी याचा समावेश होता. रुपेश मडावी हा गेली वीस वर्ष गडचिरोली जिल्ह्याच्या माओवादी संघटनेत सक्रीय भूमिकेत होता. तो माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य आणि कंपनी क्रमांक दहाचा कमांडर आहे.
त्याच्यावर 70 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून पोलीस उपनिरीक्षक वनमाने यांच्यासह काही पोलीस जवानांच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग होता. लोकसभा निवडणुकीत माओवाद्यांनी कोठी इथे मतदान केंद्रावर बीजीएलचा मारा केला होता. त्यातही रुपेश मडावीची प्रमुख भूमिका होती. तीन राज्यात मिळून 75 लाखापेक्षा जास्त बक्षीस त्याच्यावर होते.